अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- बळजबरीने लाखो रुपयांची वसुली करणाऱ्या तालुक्यातील खाजगी सावकारांची ‘पळता भुई थोडी’ करणाऱ्या कर्जत पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सावकारकी प्रकरणातील परीटवाडीच्या एका मोठ्या सावकाराला नुकतीच तीन दिवस ‘जेलची हवा’ खावी लागली होती.आता पुन्हा एकदा त्याच प्रकरणातील दुसऱ्याही खाजगी सावकाराला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याने तालुक्यातील सावकारांच्या नाड्या थंड झाल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, (दि.७ जुलै) रोजी फिर्यादी यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, सन २०१५ साली फिर्यादीचा मुलगा महेश (रा.राशीन) याने रमेश जानभरे (रा.जानभरेवस्ती,राशीन ता. कर्जत) याच्याकडुन २ लाख रुपये महिना ५ रुपये व्याजदराने घेतले होते.
मात्र रक्कम देताना सावकार रमेश जानभरे याने स्वाक्षरी केलेला युनियन बँकेचा कोरा धनादेश घेतला होता. त्यानंतर व्याजापोटी फिर्यादींनी ३ लाख रुपये सावकार जानभरे याला दिले होते.मात्र जानभरे याने घरी येऊन ‘तुझा मुलगा कुठे आहे?व्याजाचे पैसे कधी देणार?असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली होती.
व्याजाचे पैसे दिले नाही तर माझ्याजवळ असलेला कोरा धनादेश बँकेत भरून तुमच्यावर कायदेशीर कारवाई करेल. अशी धमकीही दिली होती.त्यानंतर सावकारकीचा कोणताही परवाना नसलेल्या या सावकारावर कर्जत पोलीस स्टेशन गु.र.न.४२७/२०२१ भा.द.वि.कलम ३४१,४५२,३२३,५०४,५०६ व महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम ३९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणानंतर आरोपी फरार होता. आरोपीचा शोध घेत त्यास ताब्यात घेतले आहे. कर्जत पोलिसांनी मुजोर सावकारांच्या विरोधात घेतलेला आक्रमक पावित्रा आता सर्व सावकारांना मोठा धक्काच आहे.तालुक्यातील सामान्य नागरिकांना आता सावकारकीच्या पाशातून मुक्त होऊन जगण्याचे नवे बळ मिळाले आहे.
‘सावकारांनो,भानावर या; सावकारकी ही प्रतिष्ठा नाही! ‘सावकार’ म्हणवून घेण्यात अनेकांची प्रतिष्ठेने छाती फुगते.आपण समाजातील उच्च,प्रतिष्ठित आणि इज्जतदार नागरिक आहोत असेही अनेकांना वाटते.पण, तुमची ही प्रतिष्ठा अनेक गोर-गरीब कुटुंबाची राख-रांगोळी करते.
सतत व्याजाची रक्कम भरून या कुटुंबांना दारिद्रय,दुःख,असुविधा प्रसंगी मृत्यूलाही कवटाळावे लागते.त्यामुळे आता भानावर या नाहीतर कुणाची गय नाही. तुमच्याकडे लाखो करोडो रुपये जमा होतील परंतु जेल मध्ये बसायला लागल्यावर नातेवाईक आणि मित्रांना काय सांगणार आणि त्या पैशाचा उपयोग काय…? -चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम