अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- पारनेर तहसिलदारांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करुन आमदार निलेश लंके यांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला असल्याचा आरोप करुन या प्रकरणाचा पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे.
तर आमदार लंके जनसेवक म्हणून कार्य करत असून, त्यांची प्रतिमा डागाळण्याचे काम सुपारी घेऊन करण्यात आले असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. सदर प्रकरणाची व तहसिलदार यांनी वाळू प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरकारभार केल्याचाही आरोप करीत त्यांची व कुटुंबीयांच्या संपत्तीची सखोल चौकशी करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
पारनेर तहसिलदारांनी एक ऑडिओ क्लिप व्हायरल करुन आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. तर आमदार लंके यांचे नांव घेता लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची प्रतिमा मळीन करण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. पारनेर तहसिलदारांच्या कारकिर्दीत पारनेरमध्ये वाळू माफियांनी हैदोस घालून अवैध वाळू वाहतुकीने मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे नुकसान केले.
तसेच अनेक अपघात होऊन यामध्ये काहींचा जीव देखील गेला आहे. स्वत:चे कारनामे झाकण्यासाठी लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप करुन त्यांचे राजकीय कारकीर्द बदनाम करण्याचे काम तहसिलदारांनी चालवले असल्याचे संघटनेचे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सारखे माणूस आमदार लंके यांच्या कार्याचे कौतुक केलेले असताना, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी उत्तमपणे कार्य केले आहे. कोरोना काळात त्यांनी उत्कृष्टपणे नियोजन करून हजारो कोरोना रुग्णांची सेवा केली.
जिल्ह्यात चार मंत्री असताना देखील त्यांनी स्वतंत्रपणे जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देऊन त्यांच्याबरोबरीने कार्य केले असल्याचेही अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. अशा चुकीच्या आरोपांचे निषेध नोंदवून आमदार लंके यांच्या पाठिशी तिन्ही सामाजिक संघटना उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम