अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील श्रीकांत बाळासाहेब सुसे यांची लडाख या केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला. सुसे यांची २०१६ मध्ये आयएएस म्हणून निवड झाल्यानंतर जम्मू काश्मीर केडरमध्ये नियुक्ती झाली. प्रांताधिकारी आणि नंतर अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी काम केल्यानंतर आता ते जिल्हाधिकारी झाले आहेत.
आय.ए.एस. श्रीकांत सुसे यांनी नुकताच लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. एखादी व्यक्ती संपूर्ण मेहनत आणि चिकाटीने वाटचाल करत असेल तर त्याला जगातील कोणतीच ताकद रोखू शकत नाही किंवा त्याचा पराभव करू शकत नाही.
याचेच एक उदाहरण म्हणजे श्रीकांत सुसे ज्यांनी सर्व अडचणींवर मात करत कठोर परिश्रमासह जीवनाची वाटचाल केली. श्रीकांत सुसे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील रहिवाशी.
आई गृहिणी तर वडील जिल्हा न्यायालय येथे लिपिक म्हणून कार्यरत आहेत. घरची परिस्थिती अतिशय हालाखीची होती.पण परिस्थितीचा कधी कांगावा न करता श्रीकांत यांनी आयएएस अधिकारी पर्यंत मजल मारली.
त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण राहुरी कृषी विद्यापीठातील शाळेमध्ये झाले. उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी अहमदनगर मधील रेसिडेन्सीअल ज्युनियर कॉलेज मधून घेतले.
नंतर चांगले मार्क्स मिळवून त्यांनी पुण्यातील नामांकित शासकीय अभियांत्रिकी महाविदयालयात प्रवेश मिळवला. लहानपणापासूनच जिल्हाधिकारी होण्याच्या स्वप्नाकडे महाविद्यालयात गेल्यावर खऱ्या अर्थाने त्यांची वाटचाल सुरु झाली.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर २०१६ च्या UPSC परीक्षेतील यशामुळे त्यांची भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) मध्ये त्यांची निवड झाली.
नुकतेच त्यांनी १६ फेब्रुवारीला केंद्रशासित प्रदेश लडाख मधील लेह ह्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|