अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास देणाऱ्यास मिळाली हि शिक्षा !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  अल्पवयीन मुलीचा पाठलाग व वारंवार त्रास देऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न करणारा संदीप नानासाहेब निकम रा. राहुरी स्टेशन या आरोपीला विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी मोरे यांनी २ वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड तर १ वर्षाची शिक्षा व ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

आरोपीला दोन्ही शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. ११ एप्रिल २०१९ रोजी घराबाहेर शाळेच्या बसची वाट पाहत उभी असलेल्या अल्पवयीन मुली बरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न आरोपी संदीपने केला होता. पीडित मुलीने नकार दिल्याने आरोपीने तिला धमकी दिली होती.

३० एप्रिल व १६ मे २०१९ रोजी आरोपी संदीप हा घरासमोर चकरा मारत असताना मुलीच्या आई वडिलांनी जाब विचारला असता संदीप याने मुलीच्या आई वडीलांना दमदाटी व शिवीगाळ केली होती.

पीडित मुलीच्या आईने राहुरी पोलिसात फिर्याद दिल्याने संदीपवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास राहुरीचे उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी करून न्यायालयात आरोपी विरुध्द दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील मनिषा केळगंद्रे यांनी काम पाहिले.

त्यांना महिला पोलिस काॅन्सटेबल नंदा गोडे यांचे सहकार्य झाले. या खटल्याची सुनावणी मंगळवारी जिल्हा न्यायाधीश माधुरी मोरे यांच्या समोर झाली.या खटल्यात पीडित मुलगी,आई व पंचाची साक्ष महत्त्वाची ठरली.

सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील केळगंद्रे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News