अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाने पुण्याचे नाव देशात, तसेच जगभर पोहोचविणाऱ्या बाबासाहेब कल्याणी यांना २०२१ चा पुण्यभूषण पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने देण्याचे निश्चित केले आहे.
कोविड-१९ चे सामुदायिक संकट कमी झाल्यानंतर एका खास समारंभात हा पुरस्कार सोहळा होईल. त्याच वेळी स्वातंत्र्य सैनिक आणि सीमेवर लढतांना जखमी झालेल्या काही जवानांनाही गौरवण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी आज जाहीर केले. २०२० मध्येच ही निवड करण्यात आली होती, पण कोविड १९ च्या वाढत्या संकटामुळे गेल्या वर्षी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला नाही.
पुरस्काराचे यंदाचे ३२ वे वर्ष. स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपयांची थैली असे पुण्यभूषण पुरस्काराचे स्वरूप आहे. बाबासाहेब नीळकंठ कल्याणी हे एकूण ३.० बिलीयन डॉलर्सची उलाढाल असणाऱ्या कल्याणी ग्रुप ऑफ कंपनीजमधील अग्रगण्य कंपनी असलेल्या भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
या वेळी नाईक धरमवीर सिंग, नाईक सुरेश कुमार कर्की, शिपाई के. नागी रेड्डी, हौसाबाई पाटील (सातारा) आणि माधवराव माने (सांगली) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|