मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले !

Maharashtra Rain Alert

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- मिरजगाव परिसरात अनेक ठिकाणी फळबागा तसेच शेतातील काढणीला आलेल्या कांद्याची तसेच लिंबू पिकांचे वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे.

या मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने दिवसभराच्या उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पाऊस पडल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दररोजच्या उकाड्याने तात्पुरती का होईना सुटका झाल्याचे वातावरण दिसुन आले.

परिसरात वादळी वाऱ्यामुळे काही भागातील शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाल्याची घटना घडली आहे. कोकणगाव ज्योतिबावाडी परिसरातील शाळेचे पत्रे उडाले आहे.

या मान्सूनपूर्व पावसाने तब्बल अध्र्या तासांहून अधिक वेळ जोरदार हजेरी लावल्याने मिरजगाव शहरातील अनेक भागात पावसाच्या पाण्याचे डबके साचले होते.

तर नगर सोलापूर राज्य महामार्गालगत असलेल्या खड्डयामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी दिसत होते. मिरजगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने येथील टाकळी खंडेश्वरी, चांदे बुद्रुक,

गुरवपिंप्री, मांदळी, तिखी, रवळगाव, बाभूळगाव, माहिजळगाव, पाटेवाडी, नागलवाडी, नागापूर आदी ठिकाणी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान विजेच्या कडकडाट वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe