राणे म्हणतात, सुरुवात केली वाघांना घेऊन, पण शिवसेना संपणार कुत्र्यांमुळे…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- वाईट वाटतं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी. त्यांनी पक्षाची सुरुवात केली वाघांना घेऊन. संपणार कुत्र्यांमुळे, असं ट्वीट भाजपा नेते निलेश राणे यांनी केलं आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वच राजकीय पक्षांनी कोरोनाच्या संकटात एकत्र येण्याचं आवाहन केलं असताना दुसरीकडे भाजपाकडून मात्र शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधण्यात आला.

शिवसेनेला लक्ष्य करणारे भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या बॅनरवरून शिवसेनेवर टीका केली आहे. तसेच, शिवसेनेचे स्थानिक आमदार वैभव नाईक यांच्यावर देखील त्यांनी शेलक्या भाषेत टीका केली आहे.

निलेश राणे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या एका बॅनरचा फोटो ट्वीट करून त्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचा वर्धापन दिनाचा बॅनर पण शिवसेना आमदार नाईकसारखा निघाला. एका तासात उलटा झाला.

शिवसेना पक्षाची हालत पण या बॅनरसारखीच झाली आहे. निलेश राणेंच्या ट्वीटमध्ये शिवसेना आमदार वैभव नाईक यांना लगावलेल्या टोल्यासाठी शनिवारी सकाळी राणेसमर्थक भाजपा कार्यकर्ते आणि नाईक समर्थक शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये सिंधुदुर्गात झालेल्या राड्याची पार्श्वभूमी आहे.

सिंधुदुर्गमध्ये एका पेट्रोलपंपावर शिवसेना आणि राणेसमर्थक भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी एका पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल वाटायला सुरुवात केली.

भाजपाला पेट्रोल दरवाढीवरून खिजवण्यासाठी हा प्रकार केल्याचं बोललं जात होतं. हा प्रकार लक्षात आल्यानंतर राणेसमर्थक भाजपा कार्यकर्ते तिथे पोहोचले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली.

यावेळी आमदार वैभव नाईक देखील त्यामध्ये पडले होते, पण तेवढ्यात पोलिसांनी मध्ये पडत हा प्रकार थांबवला. नितेश राणे यांनी या मुद्द्यावरून संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. शिवप्रसाद काय असतो,

ते संजय राऊतांनी आमदार वैभव नाईकांना विचारावं. पोटभर दिलाय आज आमच्या कार्यकर्त्यांनी. पाहिजे असेल, तर पार्सल घेऊन येतो सामना ऑफिसमध्ये. टेस्ट आवडेल नक्की!” असं ट्वीट करत नितेश राणेंनी संजय राऊतांना देखील या ट्वीटमध्ये टॅग केलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe