मान्यताप्राप्त शंभर टक्के अनुदानित खासगी शाळेतील शिक्षक, कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन पूर्ववत लागू करावी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- मान्यताप्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती बाबतचा शासन निर्णय तात्काळ रद्द घोषित करून खाजगी शाळेतील शिक्षक, कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे स्मरणपत्र शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड व शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना पाठविले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

मान्यताप्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम क्रमांक 19 व नियम क्रमांक 20 (2) अन्वये जुनी पेन्शन योजना व भविष्यनिर्वाह निधी योजनेचा लाभ देय आहे.

नियम क्रमांक 19 व नियम क्रमांक 20 (2) मध्ये प्रस्तावित सुधारणा करण्याबाबत प्रकाशित केलेली दि. 10 जुलै 2020 ची अधिसूचना 11 डिसेंबर 2020 ला मागे घेण्यात आली. परंतु उपरोक्त संदर्भात शासन निर्णय दि.29 नोव्हेंबर 2010 रद्द घोषित केला नाही.

त्यामुळे मान्यताप्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना आणि भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळू शकणार नाही.

या विषयाबाबत शासनातर्फे व अन्य घटकांमार्फत प्रकाशित झालेल्या वृत्तांमुळे मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे शासन शिक्षक कर्मचार्‍यांची बनवाबनवी करीत असल्याचा संदेश शिक्षण क्षेत्रात प्रसारित होत असल्याने शिक्षक परिषदेच्या वतीने खेद व्यक्त करण्यात आला आहे.

शासन निर्णय 29 नोव्हेंबर 2010 तात्काळ रद्द घोषित करून संबंधित शिक्षक कर्मचार्‍यांना भविष्य निर्वाह निधी खाते उघडण्याची परवानगी द्यावी तसेच परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेत जमा असलेली राशी संबंधित शिक्षक कर्मचार्‍यांना परत करण्याची मागणी शिक्षक परिषदेने स्मरणपत्राद्वारे केली आहे.

या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, राज्य महिला आघाडी प्रमुख पुजाताई चौधरी, नरेंद्र वातकर, किरण भावठाणकर, माजी अध्यक्ष बाबासाहेब काळे, माजी आमदार भगवान अप्पा साळुंखे, संजीवनीताई रायकर, मुंबई विभाग अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे आदी राज्य कार्यकारणी सदस्य प्रयत्नशील आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe