अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी ‘प्रवेश पात्रता परीक्षे’चे (महाटीईटी) १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी आज म्हणजेच ३ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. याआधी २०१८-१९मध्ये ही परीक्षा झाली होती. दरवर्षी साधारणपणे सात ते आठ लाख शिक्षक टीईटी देतात.
दोन वर्षांनी परीक्षा होत असल्याने यावेळी सुमारे १० लाख शिक्षक परीक्षा देतील असा अंदाज आहे. राज्यभरात २० ते २५ हजार प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या पदांवरील भरतीकरिता टीईटी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. टीईटी परीक्षेसाठी दोन पेपर घेण्यात येणार आहेत.
१ ली ते ५ वी या वर्गांसाठीच्या शिक्षकांना एक पेपर द्यावा लागतो. तर सहावी ते आठवीची परीक्षा देण्यासाठी दुसरा पेपर द्यावा लागतो. टीईटीचा पेपर क्रमांक १ देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयाती डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे.
त्याशिवाय दुसऱ्या पेपरसाठी डी.एड उत्तीर्ण असणारे उमेदवार, पदवी उत्तीर्ण, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ३ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१ पर्यंत रात्री २३.५९ वाजेपर्यंत असणार आहे.
२५ सप्टेंबर २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१ पर्यंत प्रवेशपत्राची ऑनलाइन प्रिंट घेता येणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचा पहिला पेपर हा १० ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळात होईल. तर दुसरा पेपर हा त्याच दिवशी दुपारी २ ते सायंकाळी ४.३० या वेळामध्ये होणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम