हॉटेल व्यवसायावरचे निर्बंधाचे जाळे हटवा ; हॉटेल व परमिट रूम असोसिएशनची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- कोरोनामुळे सततच्या लाॅकडाऊन व निर्बंधांमुळे नगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत हॉटेल व्यवसायाला कोट्यवधीच्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे.

शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे हॉटेल व्यवसायाचा आर्थिक कणा मोडला असून, हॉटेल व्यवसायावर आर्थिक संकट कोसळले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे ग्रामीण अर्थकारण थांबले आहे. हॉटेल, विविध व्यवसायात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे.

यामुळे करोना रूग्णसंख्या कमी झाल्याने नगर शहर व जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायिकांवर लादलेले निर्बंध हटविण्यात यावेत, अशी मागणी नगर जिल्हा हॉटेल व परमिट रूम असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे. असोसिएशनच्यावतीने बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

असोसिएशनने याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन दिले आहे. करोनामुळे हॉटेल व्यवसायिक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. संकट काळात हॉटेल व्यवसायिकांनी प्रशासनाला सहकार्य केले, तरीही आता व्यवसायिकांवर जाचक निर्बंध लादण्यात आलेले आहेत.

कोरोनाचा संसर्ग व त्यानंतर लागलेला लॉकडाऊन यामुळे हॉटेल्स व्यवसाय मोडून पडला आहे. हाॅटेल व्यवसाय केवळ निवास आणि भोजनाची सुविधा एवढ्यापुरताच मर्यादित नसून, अन्य ५० हून अधिक व्यवसायांशी जोडलेला आहे. दूध, भाजीपाला, बेकरी उत्पादनांवरही याचा परिणाम झाला आहे.

अडचणीत सापडलेल्या हॉटेल व्यवसायिकांच्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी देखील प्रशासनाची आहे. हॉटेल व्यवसायिकांवर हजारो जणांचे कुटूंब चालतात या सर्व बाबींचा विचार करून हॉटेल व्यवसायिकांवरील निर्बंध शिथिल करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe