संशोधकांनी स्पष्टच सांगितले टाइम ट्रॅव्हल लवकरच येऊ शकेल प्रत्यक्षात!

Marathi News : बॅक टू द फ्युचर, अॅडजेस्टमेंट ब्युरो, लूपर, देजावू, इंटरस्टेलर यासह डझनभर हॉलीवूड चित्रपटांमध्ये वेळेच्या प्रवासाची कल्पना केली गेली आहे. या चित्रपटांमध्ये काळाच्या पुढे-मागे जाऊन वर्तमान म्हणजेच आजचा काळ चांगला बनवण्याची कल्पना करण्यात आली आहे.

यापुढे ही केवळ कल्पनाच राहणार नाही असे दिसते, कारण भविष्यात किंवा भूतकाळातील वेळेचा प्रवास प्रत्यक्षात येऊ शकेल, असा दावा संशोधकांनी एका संशोधनाच्या माध्यमातून केला आहे.

भौतिकशास्त्रज्ञांनी क्वांटम एन्टँगलमेंट वापरून नुकतेच टाइम ट्रॅव्हलच्या मनोरंजक संकल्पनेत पाऊल ठेवले असले तरी सध्या ही पूर्णपणे सैद्धांतिक कल्पनाच असल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

क्वांटम फिजिक्सच्या अत्यंत गूढ आणि आकर्षक क्षेत्रातील वास्तविकता आपल्या जगापासून अगदीच भिन्न असून क्वांटम डोमेन केवळ सामान्य घटनांनाच नव्हे, तर काल्पनिक आणि विचित्र घटनांना प्रत्यक्षात असल्याची मान्यता देतात.

त्यावरच सुरू असलेल्या संशोधनातून संशोधकांनी टाइम ट्रॅव्हल म्हणजेच काळाचा प्रवास करण्याची कल्पना प्रत्यक्षात येण्याचा दावा केला आहे. भौतिकशास्त्राच्या सीमांचा शोध घेताना,

विशेषतः प्रकाशाच्या वेगाने फिरणाऱ्या कणांचा समावेश असलेल्या परिस्थितींसाठी संशोधन केले जात असताना, संशोधकांनी क्लोज्ड टाइमलाइक कर्क्स किंवा सीटीसीच्या मनोरंजक संकल्पनेवर प्रकाश टाकणारा अभ्यास जाहीर केला आहे.

क्वांटम – टेलिपोटेंशन सर्किट वापरून सीटीसीचे अनुकरण करणे शक्य असल्याचे या अभ्यासात दिसून आल्याचा संशोधकांचा दावा आहे. मात्र, संशोधकांच्या मते, क्वांटम एन्टँगलमेंट वापरून कोणतीही मागील निवड अथवा घटना सुधारली जाऊ शकते.

त्याच्या जटिलतेमुळे ही संकल्पना अद्याप प्रत्यक्षात आणली गेली नाही. तसेच केंब्रिज विद्यापीठातील क्वांटम फिजिक्स शास्त्रज्ञ आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक डेव्हिड अरविडसन- शुकूर यांनी हा प्रयोग मानक भौतिकशास्त्राशी मेळ बसणारा नसल्याचेही स्पष्ट केले आहे.