अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- करोनाने देशाच्या अर्थकारणाला जबर धक्का दिला. अनेकांचे रोजगार गेले आणि अनेकांचे उत्पन्न कमालीचे घटले. त्याचा थेट परिणाम अन्य व्यवसायांसह हॉटेल व्यवसायातील ग्राहकीवरही झाला.
बदल म्हणून महिन्यातून एकदोन वेळा हॉटेलकडे वळणारी मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यमवर्गीय कुटुंबे आता हॉटेलपासून दुरावली आहेत. नगर शहरात चहापासून कॅफेपर्यंत आणि बारपासून फॅमिली गार्डन रेस्टॉरंटपर्यंत दरवर्षी अनेक हॉटेल व्यावसायिकांची भर पडत होती.

जिल्ह्यात एकूण 578 परमीटबार तर सुमारे अडीच ते तीन हजार छोटी-मोठी हॉटेल्स आहेत. मात्र करोनाच्या लॉकडाऊनने अन्य व्यवसायांसोबत हॉटेल व्यवसायाला फटका बसला. राज्यात 15 ऑगस्टपासून खाद्य पदार्थांच्या स्टॉलपासून हॉटेलपर्यंत सर्वांनाच रात्री 10 पर्यंत परवानगी मिळाल्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलण्याची अपेक्षा होती.
मात्र वेळ वाढवून मिळाल्यानंतरही आव्हानांची मालिका संपलेली नाही, हे स्पष्ट झाले आहे. नगर शहरासह शहराबाहेर पडणार्या मार्गांवरील अनेक लहान-मोठी हॉटेल्स अद्यापही बंदच आहेत. काहींची स्थिती पुन्हा सुरू होण्यासारखी नाही. आता अनलॉक झाल्यानंतरही व्यवसायाला गती मिळालेली नाही.
अनेक हॉटेल्स भाडेतत्त्वावर चालवली जात होती. पूर्वी व्यवसाय चांगला असल्याने भाडे दिल्यावरही व्यवस्थापन खर्च परवडत होता. मात्र दीड वर्षांच्या करोना निर्बंधांनी व्यवसायाचे कंबरडे मोडले. त्यामुळे आता हॉटेलचे भाडे देणेही शक्य नाही, हे लक्षात आल्याने अनेकांसमोर हॉटेल व्यवसायात पुन्हा यावे की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ग्राहकांची कमी, कामगारांची वाणवा, महागाईची झळ आणि हॉटेल व्यवस्थापनाचा वाढता खर्च या आव्हानांनी व्यावसायिकांवर पुनर्विचाराची वेळ आणली आहे. मात्र आगामी काळात व्यवसाय स्थिर होईल, असा आशावाद हॉटेल चालक-मालक बाळगून असले तरी नव्या आव्हानांची जाणीवही होऊ लागली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम