अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- केडगावची लोकसंख्या मागील अनेक वर्षांमध्ये वाढली आहे. चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग अशा घटना वारंवार घडत असतात. तसेच गुन्हेगारी स्वरूपाची कृत्य होत असतात.
केडगावच्या नागरिकांना पोलीस प्रशासनाची पुरेशी आणि तत्पर सेवा मिळण्याच्या दृष्टीने केडगावसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन मंजुरीसाठी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
नुकताच ना. थोरात यांचा नगर शहर दौरा झाला. यावेळी ही मागणी काळे यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केली आहे. यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, शहर जिल्हा सरचिटणीस नलिनीताई गायकवाड आदी उपस्थित होते.
याबाबत काळे यांनी म्हटले आहे की, आज रोजी केडगाव हे कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये समाविष्ट आहे. ही पूर्वीपासूनची रचना आहे. मात्र मागील काही वर्षांपासून केडगावच्या लोकसंख्येत वाढ झाली असून कोतवाली पोलीस स्टेशनवर याचा ताण पडतो आहे.
कोतवाली पोलिस स्टेशनच्या हद्दी मध्ये असणारी गुन्ह्यांची संख्या आणि उपलब्ध असणारे मनुष्यबळ पाहता केडगाव मधील नागरिकांना स्वतंत्र पोलीस स्टेशन मिळाल्यास त्यानिमित्ताने केडगावसाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकेल.
तसेच केडगाव पासून कोतवाली पोलिस स्टेशन हे दूर असून केडगाव मध्येच पोलीस स्टेशनची वास्तु झाली तर नागरिकांना आपल्या समस्यांसाठी जाणे-येणे सोयीचे होऊ शकेल, असे काळे यांनी म्हटले आहे.
किरण काळे यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी देखील चर्चा केली असून पोलीस प्रशासनाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने पुढाकार घेत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही देण्यात आली आहे.
याबाबतचे प्रशासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करण्यात यावेत अशी विनंती यावेळी मनोज गुंदेचा, नलिनी गायकवाड यांनी केली आहे.
ना. बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या मागणीची दखल घेत केडगावला स्वतंत्र पोलीस स्टेशन मंजूर होणेबाबत आपण गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन दिले आहे.
केडगावसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन मंजूर करण्यात यावे अशी मागणी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांनी केली आहे.
यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, शहर जिल्हा सरचिटणीस नलिनीताई गायकवाड आदी उपस्थित होते.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|