अहमदनगर Live24 टीम, 11 जुलै 2021 :- देशाची अर्थव्यवस्था उभारी देण्याचे महत्वाचे काम उद्योग क्षेत्र करीत असते. त्यामुळे उद्योगाला बळ देणे हे प्रत्येक राज्यकर्त्यांचे आणि प्रशासनाचे कर्तव्यच असते. त्यामुळे नगर शहराचा औद्योगिक विकासासाठी येथील उद्योजकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करु.
सर्वांना सोबत घेऊन विकासासाठी हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चित पुढाकार घेऊन पाठपुरावा करु, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. यावेळी उद्योजकांनी त्यांना येणाऱ्या अडचणी महसूलमंत्री थोरात यांच्यासमोर मांडल्या.
ग्रामपंचायत आणि एमआयडीसी या दोन्ही यंत्रणा असून एकाच वेळेला दुहेरी कर आकारला जातो, पाण्याची पाईपलाईन जुनी झाल्याने ती सतत फुटते. नगर-मनमाड रस्त्याच्या विस्तारीकरणाची गरज, एमआयडीसी परिसरामध्ये असणारे ट्रक टर्मिनल मंजूर करण्याची मागणी आदींबाबत उद्योजकांनी ना.थोरात यांना माहिती दिली.
औद्योगिकरण होत असताना उद्योग अधिक चांगल्या प्रकारे चालावे यासाठी त्यांना योग्य वातावरण देणे आवश्यक आहे. उद्योजकांनी केलेल्या काही मागण्या या राज्य स्तरावरील आहेत.
त्यामुळे याबाबत निश्चितपणे राज्य स्तरावर पाठपुरावा केला जाईल. स्थानिक उद्योजक, येथील संघटना यांना सोबत घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करु. तसेच प्रत्येक प्रश्नासाठी ज्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करून त्या मार्गी लावू, असे ना.थोरात यांनी स्पष्ट केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम