महसूलमंत्री थोरात म्हणाले…राज ठाकरे भविष्यात भाजपा सोबत जातील असं तुर्तास तरी वाटत नाही

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आज मुंबई भेट झाली. या भेटीवर काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांना चांगलाच टोला लगावला आहे.

थोरात म्हणाले, राज ठाकरेंना लाव रे तो व्हिडीओ प्रयोग आठवत असतील, असं म्हणत त्यांनी ठाकरे यांना चिमटा काढला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे, पण तत्पूर्वीच महाराष्ट्रामध्ये नवीन राजकीय समीकरणं घडामोडी सुरू झाल्या आहेत.

भाजप आणि मनसे महापालिकेच्या निवडणुकीत एकत्रित येण्याच्या चर्चेला यामुळे अधिकच बळ मिळाले आहे. राजकीय वर्तुळात या भेटीवर वेगवेगळ्या प्रक्रिया घडत असतानाच काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र राज ठाकरे यांना खोचक टोला लगावला.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांना भाजपा विषयी केलेली भाषणं आठवत असतील, त्यांनी ज्या पद्धतीने भाजपावर टीका केली आहे, त्यावरून तरी किमान राज ठाकरे भविष्यात भाजपा सोबत जातील असं तुर्तास तरी वाटत नाही, असंही थोरात म्हणाले.

राज ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वाधिक टीका भाजपवर केली होती. राज ठाकरे यांचा लाव रे तो व्हिडिओ हा विषय खूप चर्चेचा झाला होता.

आता मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी मनसे भाजप अशी नवीन राजकीय समीकरण सुरू झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची गाठीभेटी सुरू असल्याचं म्हटलं जातंय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe