मराठा आरक्षणाचे मार्ग बंद झाले नाहीत : छत्रपती संभाजीराजे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- ‘मराठा आरक्षण लढ्यात आतापर्यंत बऱ्याच घडामोडी होऊन गेल्या. शेवटचा पर्याय म्हणून केंद्र सरकारने दाखल केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. असे असले तरी सर्व मार्ग बंद झालेले नाहीत.

असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे. काल ते संवाद दौऱ्यानिमित्ताने नगर जिल्ह्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, यासाठी आता केंद्र सरकराने अध्यादेश  काढावा.

त्यानंतर हा कायदा मंजूर करून घ्यावा, हा पर्याय खुला असून त्याला काही अवधी लागू शकतो. मात्र त्या काळात राज्य सरकारने त्यांच्या हातात जे देता येणे शक्य आहे, ते द्यावे. या लढ्यातून मला स्वत:ला काहीही साध्य करायचे नाही.

राज्यातील ७० टक्के मराठा समाज गरीब आहे. त्यांच्यासाठी आपला हा लढा सुरू आहे. त्यामुळे पूर्वी काढण्यात आलेल्या मोर्चांतील मागण्यांपैकी सहा प्रमुख मागण्या आम्ही पुढे ठेवल्या आहेत.

त्यातीलच सारथी संस्थेसंबंधीची आहे. राज्यात जशी बार्टी, महाज्योती या संस्था विविध समाजासाठी आहेत, तशीच सारथीही सक्षम व्हावी, अशी आमची मागणी आहे.

आरक्षण मिळेपर्यंत या संस्थेमार्फत काही लाभ गरीब मराठा विद्यार्थ्यांना मिळू शकतात. त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe