अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट धुमाकूळ घालत आहे, मात्र एन संकटाच्या वेळेतही राजकारण आणि टीकाटिप्पणी थांबायला तयार नाही.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कोविड केअर सेंटरमध्ये केलेल्या नृत्यावरून सुरू वाद निर्माण झाले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी होतेय.
अतुल भातखळकर यांनीही पवार यांच्यावर टीका केली आहे.त्यांनी म्हटले आहे, ‘कोविड रुग्णांना नातेवाईकांची भेट घेण्याची परवानगी नाही आणि कोविड सेंटरमध्ये रोहित पवार यांना नाचायची परवानगी आहे? वडिलोपार्जित कंपन्यांसारखे सरकार चालवू नका.
नियम सगळ्यांना सारखे हवेत,’ असे भातखळकर यांनी म्हटले आहे. याला पवार यांच्याकडूनही उत्तर देण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी जुन्या बातम्यांचे स्क्रीन शॉट शेअर केले आहेत.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे २५ वर्षीय पुतणे तन्मय यांनी करोना प्रतिबंधक लस घेतल्याच्या त्या बातम्या आहेत.
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस घेण्याची परवानगी मिळण्यापूर्वीच तन्मय यांनी लस घेतली होती. त्यावेळी नियम मोडून हे लसीकरण कसे करण्यात आले, यावरून वाद झाला होता.
यासंबंधीच्या बातम्या शेअर करून पवार यांनी भातखळकरांना उद्देशून म्हटले आहे की, ‘नियमांची गोष्ट कोण करतंय? आपल्या पायाखाली काय जळतंय ते बघा आधी.
उगीच कशाला नेहमीच नाकाने कांदे सोलण्याचा प्रयत्न करता? यामुळं स्वतःचेच जास्त वांधे होतील! असे आक्रमक उत्तर आमदार रोहित पवार यांनी दिले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम