पळून जातानाच जखमी झाला होता सादिक; प्राथमिक अहवालात आले समोर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील आठवड्यामध्ये आरोपीचा पोलिसांच्या गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात प्राथमिक अहवालानुसार सदरची घटना ही गाडीतून आरोपी पळून जाताना पडून जखमी झाला असल्याचे प्राथमिक अहवालातून समोर येत आहे.

मात्र, दुसरीकडे या प्रकरणांमध्ये आरोपी आणताना हलगर्जी केल्याप्रकरणी संबंधित पोलिसांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी म्हटले आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोस्को गुन्ह्यातील आरोपी पसार झालेला होता,

त्याचा शोध घेण्यासाठी भिंगार पोलीस मागील आठवड्यामध्ये आरोपी सादिक बिराजदार याला पकडण्यासाठी गेले असता, भिंगार जवळील नाल्याजवळ त्यांनी पोलिसांच्या गाडीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणांमध्ये तो गंभीररित्या जखमी झाला होता.

उपचारादरम्यान तो मयत झाला. यासंदर्भात पोलिसांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. तर दुसरीकडे बिराजदार यांच्या पत्नी रुकसार यांनी जी फिर्याद दिली होती, त्यानुसार सुद्धा गुन्हा दाखल झालेला होता. दोन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे येथे दाखल झाले होते.

त्यानुसार या दोन्ही प्रकरणांची व घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिल्यानंतर येतील घटनेचा तपास करून प्राथमिक अहवाल पोलिस अधीक्षकांकडे सादर करण्यात आलेला आहे. प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर यामध्ये सदरची घटना ही पोलीस विभागाच्या आरोपी पकडण्याच्या संदर्भात योग्य कार्यवाही झालेली नाही.

जेवढी काळजी घ्यायला पाहिजे होती, तेवढी घेतलेली नाही, असे प्राथमिक अहवालावरून दिसून येत असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. या संदर्भामध्ये अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित पोलिसांवर निश्चित कारवाई केली जाईल, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

तपासाच्या प्राथमिक अहवालामध्ये सदरची घटना ही पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घडलेली आहे, हे प्राथमिक दृष्ट्या समोर येत आहे, पण यासंदर्भातला अहवाल अंतिम आल्यानंतर सर्व बाबींचा उलगडा स्पष्ट होईल, असेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले. आम्ही फिर्यादीच्या चौकश्या केलेल्या आहेत.

तसेच जे कोणी पोलिस या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर सुद्धा निश्चितपणे कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस प्रशासनाची खात्यांतर्गत चौकशीमध्ये या बाबी समोर आलेले आहेत. मात्र भिंगार कॅम्प मध्ये घडलेल्या प्रकाराचा सीआयडी स्वतंत्र तपास करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान शवविच्छेदनाचा अहवाल आला असून यात प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे. डोक्याला व शरीराला जखम झाली असल्याचे यात म्हटले आहे. सविस्तर माहिती अद्याप आलेली नाही. मात्र फॉरेन्सिक विभागाकडून आलेल्या अहवालामध्ये सदरची घटना ही अपघात असल्याचे दिसून येत आहे, असेही पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe