छापील किंमतीपेक्षा जादादाराने होतेय खतांची विक्री; प्रशासनाची डोळेझाक

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- राहाता शहरातील तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया खरेदीसाठी आलेल्या शेतकर्‍यांची सर्रासपणे लूट होत आहे.

छापील किंमतीपेक्षा जादादाराने कृषी सेवा कांद्राकडून शेतकऱ्यांना खतांची विक्री केली जात आहे. बळीराजावर अन्याय होत असताना कृषी विभागाकडून केवळ कारवाईच्या धमक्या दिल्या जातात. प्रत्यक्षात मात्र असा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही असेच चित्र सध्या निर्माण झाले आहे.

दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने शेतकर्‍यांची मशागतीसाठी लगबग सुरू झाली आहे. युरिया खत घेण्यासाठी अनेक ठिकाणी शेतकर्‍यांची झुंबड उडत आहे. युरियाचा तुटवडा असल्याने शेतकर्‍यांना मोठी धावपळ करावी लागत आहे.

याचाच फायदा घेत राहाता तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांवर चढ्या दराने युरिया विकली जात आहे. 266 रुपयांची एक गोणी 350 रुपयांना विकली जात असून 80 ते 85 रुपये जास्त आकारले जात आहेत. तुटवडा असल्याने नाईलाजास्तव शेतकर्‍यांना वाढीव पैसे देऊन युरिया खरेदी करण्याची वेळ आली आहे.

तर काही कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया गोणी हवी असेल तर शेतीसाठी लागणारे इतर खते किंवा औषध घेण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे याप्रकरणी कृषी अधिकार्‍यांनी लक्ष घालण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.