अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- आई शेवटी आईच असते. आपल्या मुलासाठी आई कोणत्याही संकटाशी दोन हात करण्यास मागे पुढे पाहत नाही.
मात्र त्याच आपल्या काळजाच्या तुकड्याचा मृत्यू झाल्याने त्या आईची काय अवस्था होते याची कल्पना न केलेली बरी. नगर तालुक्यातील जेऊर येथे विजेच्या धक्क्याने एका वानराच्या पिलाचा मृत्यू झाला.
यावेळी या वानराच्या आईने त्या चिमुकल्या पिल्लाचा मृतदेह छातीशी कवटाळून धरत केलेला आक्रोश पाहून अनेकांचे आश्रू अनावर झाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर गावामध्ये एक महिन्यापासून पंधरा ते वीस वानरांचा कळप आलेला आहे. महिन्यापासून वानरांचा वावर अनेकांच्या घरावर तसेच अंगणात होता.
लहान मुले देखील वानरांच्या मर्कटलीला मोठ्या आनंदाने पाहत होते. या वानरांचा लळा चिमुकल्यांसह लहान मोठ्यांना देखील लागलेला होता.
त्यातच शुक्रवार दि. १९ रोजी एका वानराच्या पिलाला विजेचा धक्का बसला अन् त्याचा जागेवरच मृत्यू झाला. पिल्लाची आई मृत्युमुखी पडलेल्या पिल्लाला गोंजारत आपल्या छातीशी धरून केलेला आक्रोश पाहून नागरिकांनाही अश्रू अनावर झाले.
मृत्यूमुखी पडलेल्या वानराला उचलण्यासाठी आलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही पिलाची आई व इतर वानरे हात लावू देत नव्हती. मोठ्या अथक परिश्रमानंतर मृत्युमुखी पडलेल्या वानराच्या पिलाला वनविभागाने ताब्यात घेतले.
त्यावेळी पिलाच्या आईची झालेली तळमळ पाहून नागरिकांच्या मनाची देखील प्रचंड कालवाकालव झाली. अत्यंत जड अंतकरणाने या वानरावर ग्रामस्थानी विधीवत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|