अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हणतात ते अगदी खरे आहे तर जगात आई सारखे निस्वार्थ प्रेम कोणी करू शकत नाही.
अशीच एक माय आपल्या लेकराच्या आठवणीत स्वतःला हरवून बसली… कोतूळ येथील एका मंदिराच्या आवारात गेल्या महिन्यापासून नंदा दुटे (सासर- शिरसगाव धुपे, संगमनेर) ही ३५ वर्षांची विवाहित मनोरुग्ण महिला कित्येक दिवस रस्त्यावरील पडलेले अन्न व गटारातील पाण्यावर जगत होती.
ही माहिती समाजमाध्यमातून प्रसिद्ध होताच नगर तालुक्यातील देहरे येथील माऊली संस्थेत मनोरुग्णांची सेवा करणारे डाॅ. राजेंद्र धामणे, डाॅ. किरण राजेंद्र धामणे यांनी स्वतः कोतूळ येथे येऊन रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी नेले. माझी बाळं मला द्या, मी वेडी नाही.
मी घरी जाते, असे ती ओरडून सांगत होती. मदर डे ला असा आईचा मुलासाठी टाहो पाहून डाॅ. धामणे यांच्यासह उपस्थितांचे डोळे पाणावले. कोण आहे ही नंदा ? नंदाला दोन मुले असून, पती शासकीय नोकरीत तर सासरे सेवानिवृत्त असल्याचे समोर आले.
नंदाला २० वर्षांचा एक भाऊ असून तो गरिबीने पोटासाठी आळेफाटा, नारायणगावात मोलमजुरी करतो. त्याने नंदाची सर्वमाहिती सांगितली.
दरम्यान काही राजकीय नेतेमंडळींनी या प्रकरणी लक्ष घातले आहे. यामुळे आता नंदाच्याबाबत सखोल चौकशी सुरू झाली असून, तिला कोणी व का घराबाहेर काढले, याचा छडा लवकरच लागणार आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|