शौचालयाला छत्रपतींचे नाव दिल्याने शिवसैनिक झाले संतप्त

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :-  महाराष्ट्राच्या अखंड जनतेचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकले तरी अंगात उत्साहाची, अभिमानाची वीज संचारते.

अशातच एक ठिकाणच्या नामकरणावरून सध्या शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राहाता येथील छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज संकुलाच्या शौचालयाला छत्रपतींचे नाव दिल्याने शिवसैनिक संतप्त झाले.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संकुलाच्या शेजारी नगरपालिकेने बांधलेल्या शौचालयास छत्रपतींचे नाव दिल्याने शिवप्रेमी आणि शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून ही विकृत कल्पना ज्यांना सुचली त्यांचेवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी केली आहे.

शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, नगरसेवक सागर लुटे, भागवत लांडगे यांनी सदर ठिकाणी जाऊन ते नाव हटवत नगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला आहे. छत्रपतींचे नाव शौचालयास देणे हा फक्त विकृतपणा आहे. नगरपालिका प्रशासनाने ही घोडचूक केली आहे.

सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचे काम न.पा. प्रशासनाने केले असून ही गंभीर बाब राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे पठारे यांनी सांगितले. ज्यांनी हा विकृतपणा केला असेल त्यांचेवर कारवाई व्हावी, अशी मागणी पठारे यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News