शिवाजी महाराजांनी दुर्बल व वंचित घटकांना न्याय व आधार देण्याचे कार्य केले -जयंत येलुलकर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-महापुरुषांची जयंती फक्त घोषणा देवून वाद्यांवर नाचण्यासाठी नव्हे, तर त्यांचे विचार आत्मसात करुन प्रेरणा घेण्यासाठी आहे. शिवाजी महाराज एका समाजापुरते मर्यादित नसून, त्यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले.

त्यांच्या राज्यात सर्वधर्म समभावाची शिकवण होती. तर दुर्बल व वंचित घटकांना त्यांनी न्याय व आधार देण्याचे कार्य केले. या महापुरुषांच्या विचाराने फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने निस्वार्थ भावनेने रुग्णसेवा घडत असल्याची भावना रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव सप्ताहानिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी येलुलकर बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी एमइएसचे वरिष्ठ अधिकारी अभिषेक चिपाडे, डॉ. किरण कवडे, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. येलुलकर बोलताना पुढे म्हणाले की, समाजासाठी आपण काही देणं लागतो या कर्तव्य भावनेतून गेल्या पंचवीस वर्षांपासून दीन दुबळे,

वंचित, ज्येष्ठांसाठी निस्वार्थ भावनेतून मनापासुन सेवा करणारे जालिंदर बोरुडे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या माध्यमातून हजारो नेत्रदोष असलेल्या रुग्णांना नवदृष्टी मिळाली आहे. नागरदेवळे येथील नेत्रउपचार शिबिराची ख्याती राज्यभर पसरली असून, याचा नगरवासियांना अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

अभिषेक चिपाडे म्हणाले की, जालिंदर बोरुडे व त्यांच्या सहकार्‍यांनी सुरु केलेली ही आरोग्य क्षेत्रातील सामाजिक चळवळ भविष्यात तरुण पिढीला सेवेचा एक वेगळा संस्कार देणारी आहे. रुग्णसेवेसाठी फाउंडेशनने सुरु केलेले अथक कार्य अविरत सुरु राहण्यासाठी नगरकर त्यांच्यापाठीशी कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले.

जालिंदर बोरुडे यांनी समाजातील महापुरुषांनी वंचितांना नेहमीच आधार देण्याचे कार्य केले. त्यांचे कार्य आजही सर्व समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी आहे. त्यांचे आदर्श समोर ठेऊन समाजातील अनेक गरजू घटकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशन विविध मोफत आरोग्य शिबीर घेत आहे.

फिनिक्सच्या वतीने सुरु असलेल्या नेत्रसेवेच्या चळवळीमुळे हजारो रुग्णांची सेवा करताना जीवनात समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आनंदऋषी नेत्रालय यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबीरात 448 रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.

मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 117 रुग्णांची निवड करण्यात आली आहे. तर फाऊंडेशनने केलेल्या अवयवदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत 37 नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला.

पाहुण्यांचे स्वागत बाबासाहेब घिवर यांनी केले. सूत्रसंचालन सौरभ बोरुडे यांनी केले. डॉ संजय शिंदे यांनी आभार मानले. शिबिराच्या यशस्वितेसाठी गौरव बोरुडे, आकाश धाडगे आदींसह फिनिक्स फाऊंडेशनचे सदस्य व नागरदेवळे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe