अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-सरपण तोडण्याच्या किरकोळ कारणावरुन जावाने आपल्याच जावाच्या अंगावर डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला.
यावेळी लहान मुलीच्या तप्तरतेने या महिलेचा जीव वाचला, मात्र ती महीला ६० टक्के भाजलेली असून तिच्या जबाबावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्चना सदाशिव उर्फ दत्तू शिंदे असे या महिलेचे नाव असून संगमनेर तालुक्यातील मनोली येथे ही घटना घडली. याबाबत त्या महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे की, माझे पती सेंट्रीगचे काम करत असून त्यांना किडनीचा आजार आहे.
भाया शंकर सावित्रा शिंदे, जाव आकांक्षा व चुलत सासू हरणाबाई नाना शिंदे असे एकत्रित कुटुंब आमच्याच शेजारी रहाते. भाया नोकरीनिमित्त परभणी येथे वास्तव्यास आहे.
माझ्या पतीच्या आजारावर उपचार करण्यासाठी पैशाची गरज असल्याने आम्ही आमच्या हिश्याची जमीन विक्रीस काढली होती. त्यामुळे भाया आमची जमीन कमी किमतीत मागू लागला.
मात्र दुसरीकडून जास्त पैसे मिळाल्याने आम्ही ती जमीन त्याना विकली. याचाच राग मनात धरुन सासू हरणाबाई, जाव व भाया या ना त्या कारणावरुन सतत आमच्यासोबत वाद घालत होते.
गुरुवारी घराशेजारी मी सरपण तोडत असताना जाव आकांक्षा तेथे आली व आमचे सरपण तोडू नको म्हणत तिने भायाला फोन केला.
फोनवरुन भाया सुद्धा म्हणाला की, आमचे सरपण आहे तोडू नको नाहीतर पैसे दे. पण माझे सरपण असल्याने मी तोडणार म्हटल्यावर,
जाव आकांक्षाने कुऱ्हाडीच्या दाड्याने मला मारहाण केली व हीची कटकट कायमचीच मिटवू म्हणत घरातील डिझेलचा डबा आणला यावेळी सासू हरणाबाई हिने माझे दोन्ही हात धरले व जावाने माझ्या अंगावर डिझेल ओतून आग लावली.
त्यामुळे मी आरडा ओरड केल्याने माझ्या मुली घराबाहेर आल्या व त्यांनी कुकर व मग्यामध्ये पाणी आणून मला लागलेली आग विझवली.
त्यानंतर पतीला फोनवरुन घडलेला प्रकार सांगितल्याने पती तत्काळ घटनास्थळी आले व त्यांनी मला प्रवरा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केल्याचे म्हटले आहे.
दरम्यान जाव आकांक्षा शंकर शिंदे, सासु हरणाबाई नाना शिंदे व भाया शंकर सावित्रा शिंदे या तिघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|