अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग येऊन पाथर्डीच्या माणिकराव खेडकर यांनी आपल्या नातेवाईकांसह येऊन आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या जावयास त्याच्या घरासमोर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत दाखल फिर्यादीवरुन 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवासा पोलिसांनी यातील 7 आरोपींना सायंकाळी ताब्यात घेवून अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासा येथील बंटी उर्फ प्रशांत राजेंद्र वाघ याने व पाथर्डीतील ऋतुजा माणिक खेडकर यांनी १ मार्च रोजी आंतरजातीय विवाह केला होता.
या विवाहास मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे मुलीचे वडील माणिक खेडकर यांनी अनेकदा मुलीला सोबत पाठवा, अशी धमकी प्रशांत वाघला दिली होती. शनिवारी दुपारी नेवासा शहरातील कडूगल्ली येथे वाघ यांच्या घरासमोर तीन ते चार चार चाकी वाहने आली.
यातील एका कारमधून मुलीचे वडील माणिक खेडकर, भाऊ ऋषीकेश खेडकर व एक अनोळखी इसम उतरले. यावेळी दरवाजासमोर असलेल्या प्रशांतवर एकाने गुप्तीचा वार केला. यावेळी माणिक खेडकर यांच्या भावाच्या हातात पिस्तूलसारखे हत्यार होते.
ते त्यांनी प्रशांतच्या दिशेने रोखले होते. याशिवाय इतर कारमधून उतरलेल्या इसमांच्या हातात चाकू, लोखंडी रॉड, पिस्तूल, एअरगन होते. माणिक खेडकर हे ओरडून याला मारा सोडू नका, असे बोलत होते. अचानक झालेल्या गोंधळामुळे गल्लीतील लोक जमा झाले.
जमलेले लोक पाहून सर्वजण कारमध्ये बसून नेवासा फाट्याच्या दिशेने पळाले. प्रशांतने पोलिस स्टेशनला फोन करून माहिती दिली. पोलिसांनी तत्परता दाखवून भानस हिवरा रोडवर हॉटेल सावताजवळ आरोपींना पकडले.
पोलिसांनी तीन गाड्यांसह सात जणांना ताब्यात घेतले. परंतु माणिक कोंडिबा खेडकर, ऋषिकेश खेडकर व त्यांचा भाऊ हे वेगळ्या वाहनाने फरार झाले, अशी फिर्याद प्रशांत वाघ याने नेवासे पोलिसात दिली. सध्या सात जणांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|