अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- राज्यात गोहत्या बंदीचा कायदा अस्तित्वात असतानाही संगमनेर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कत्तलखाने खुलेआमपणे सुरू आहेत.
शहरातील गोमांसाला मुंबई, ठाणे व कर्नाटकात मोठी मागणी आहे. संगमनेर शहरांमधून दररोज हजारो किलो गोवंश जातीच्या जनावरांचे मांस निर्यात केले जात आहे. या बेकायदेशीर कत्तलखान्यांमधून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे संगमनेर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या पाच कत्तलखान्यांमधून दररोज तीनशे गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती समोर आली आहे. एवढे सगळं सुरु असताना मात्र पोलिसांकडून काहीच कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान गोमांस विक्रीचे राज्यातील प्रमुख केंद्र अशी ओळख आता संगमनेर शहराची होऊ लागली आहे. पोलिसांनी शेकडो वेळा कारवाया करूनही शहरातील कत्तलखाने सुरूच असल्याने पोलिसांच्या कारवाईकडे आता संशयाने पाहिले जात आहे.
संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड, जमजम कॉलनी, जोर्वे रोड या त्रिकोणामध्ये खुलेआम बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असतात. या कत्तलखान्यातील घाणीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
याबाबत संबंधित नागरिकांनी संगमनेर नगरपालिकेला वेळोवेळी कळवूनही नगरपालिकेने याची दखल घेतलेली नाही. शहरातील बेकायदेशीर कत्तलखाने बंद करण्यात यावेत, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना व अनेक नागरिकांची आहे.
मात्र पोलीस खात्याकडून याबाबत समाधानकारक कारवाई होताना दिसत नाही. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कत्तलखान्यावर कारवाई करावी, असे आदेश संगमनेर येथील एका भेटीत दिले होते.
मात्र संगमनेर पोलिसांकडून या आदेशाची पायमल्ली करण्यात येत आहे. कत्तलखाना चालकाशी असलेल्या संबंधातून पोलिसांचे या कत्तलखान्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम