अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- यंदाच्या खरीप हंगामाच्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी 60 हजार 392 क्विंटल बियाण्याची, तर अडीच लाख मेट्रिक टन खताची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
त्यातून दहा टक्के म्हणजे 6 हजार 420 क्विंटल बियाणे, तर पन्नास टक्के खते उपलब्ध झाली आहेत. म्हणजेच मागणीच्या तुलनेत अत्यल्प पुरवठा झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ठ होत आहे. सध्या राज्यात करोनाचे संकट आहे.
त्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेऊन जिल्ह्यात सर्व शेतकर्यांना कृषीविषयक बाबींचा पुरवठा करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. कृषी विभागाने यंदाच्या हंगामासाठी एकूण 60 हजार 392 क्विंटल बियाणांची मागणी केली आहे.
त्यातून आज अखेर 6 हजार 420 क्विंटल बियाणाचा पुरवठा झालेला आहे. त्यामध्ये कापूस बियाण्यासाठी 5 लाख 25 हजार 476 पाकिटे (प्रत्येकी 450 ग्रॅम) एवढा कोटा मंजूर झाला आहे. त्याची प्रत्यक्ष विक्री शेतकर्यांना 1 जूननंतर करण्याच्या सूचना वितरकांना देण्यात आलेल्या आहेत.
याशिवाय एकूण 2 लाख 55 हजार मेट्रिक टन खताची मागणी केली असून त्यातून 2 लाख 11 हजार मेट्रिक टन कोटा मंजूर झाला आहे. आज अखेर 1 लाख 26 हजार टन खत उपलब्ध झाले आहे. यापैकी 31 हजार 285 टन खताची विक्री झाली असून 94 हजार 800 मेट्रिक टन खत शिल्लक आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकर्यांना सर्व बी-बियाणे रासायनिक खते व औषधे वेळेवर व मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावेत, या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान उर्वरित बियाणे आणि खतांचा लवकरच पुरवठा होण्याचा विश्वास जिल्हा परिषद कृषी विभागाला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|