Ahmednagar News :- शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या प्रत्येक आदेशाला विरोध होतोच, कधी पालक-विद्यार्थी तर कधी शिक्षक संघटना विरोध करतात. असेच सध्या पहायला मिळत आहे.
करोना काळात शाळा बंद होत्या. त्यामुळे बुडालेला अभ्यास भरून काढण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंत शाळा पूर्णवेळ सुरू ठेवाव्यात. तिसऱ्या आठवड्यात परीक्षा घेऊन मेपासून सुट्टी द्यावी, असा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/09/Ahmednagar-News-School-bell-to-ring-from-October-4.jpg)
या निर्णयाला शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. त्याचे कारण देताना संघटनांनी म्हटले आहे, नुकसान झालेला अभ्यासक्रम शिक्षकांनी आधीच भरून काढला आहे.
त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने उशिरा काढलेला हा आदेश रद्द करून सोयीप्रमाणे परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केली आहे.
अशी माहिती डॉ. नवनाथ टकले व प्रा. सतीश शिर्के यांनी दिली आहे. बहुतांश ठिकाणी शिक्षकांनी ज्यादा काम करून अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
अनेक ठिकाणी अंतर्गत मूल्यमापन पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. बहुसंख्य शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षांचे नियोजन केले आहे. काही ठिकाणी परीक्षा सुरू झाल्या आहेत.
पालकांनी गावी जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षणही केले आहे. अशा परिस्थितीत शिक्षण विभागाच्या परिपत्रकामुळे शाळांची परीक्षांची तयारी वाया जाणार आहे.
पालकांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. त्यामुळे परीक्षा सोयीनुसार घेऊ द्या. शैक्षणिक वर्ष १ मे रोजी समाप्त करून २ मे पासून शाळांना सुट्टी जाहीर करावी, अशी आमची मागणी आहे.