….. म्हणून ‘त्या’ महिलेचा कुटुंबीयांसह आत्महत्या करण्याचा इशारा!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-   ग्रामसेवकाने पदाचा गैरवापर करून आपल्या जागेची नोंद दुसर्‍याच्या नावाने लावून अन्याय केला आहे. याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल न घेतल्यामुळे नाशिक विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

जर या प्रकरणी न्याय मिळाला नाही तर कुटुंबीयांसह आत्महत्या करण्याचा इशारा पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील हौसाबाई साळवे यांनी दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील वानकुटे येथील हौसाबाई एकनाथ साळवे ही महिला गावठाणात राहतात.

त्यांचा मुलगा गणेश साळवे याची नाव व मिळकत क्रमांक ८२८ जागा असून, ती ग्रामपंचायतीने वापरण्यास दिली होती. त्या जागेची वेळोवेळी कर पावती साळवे कुटुंबीय भरत होते. परंतु काही दिवसांनी ती मिळकत ८७२ परस्पर बबन सिताराम साळवे यांना देऊन ग्रामपंचायतीने अन्याय केला असल्याचे हौसाबाई यांनी निवेदनात म्हंटले आहे.

सदर प्रकरणाचा पाठपुरावा वेळोवेळी प्रशासकीय अधिकारी वनकुटे ग्रामपंचायत, पंचायत समिती पारनेर, तहसील अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग, जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आला.

न्याय मिळण्यासाठी उपोषण केले असता लिखित स्वरूपात उत्तर देऊन उपोषणापासून परावृत्त करण्यात आले. परंतु त्यावर अजूनही कारवाई झालेली नाही. या जागेच्या वादामुळे जीवे मारण्याच्या धमक्या येत असून, प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याचे हौसाबाई यांनी स्पष्ट केले आहे.

सदर जागा पुन्हा नावावर करावी, जागेची फेरबदल प्रकरणी चौकशी करुन संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी नाशिक येथे विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर उपोषण केले जाणार आहे.

तरी देखील न्याय न मिळाल्यास सर्व कुटुंबीय जीवनयात्रा संपवणार असल्याचे त्यांनी निवेदनात नमुद केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe