… म्हणून राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘ती’ ग्रामसभा ठरणार महत्त्वपूर्ण

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra news : सध्या राज्यातील शेतकरी विविध समस्यांनी त्रस्त असून राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत आहेत.

त्यामुळे शेतकरी प्रश्नांबाबत आंदोलन हाती घेण्यासाठी राहाता तालुक्यातील पुणतांब्य़ातील शेतकरी पुन्हा एकवटले आहेत.पुणतांबा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या एका बैठकीत शेतकऱ्यांनी विविध समस्या मांडल्या. तर सोमवारी (दि. २३) विशेष ग्रामसभा घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

त्यामुळे आता या ग्रामसभेत काय निर्णय घेण्यात येईल याकडे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.मागील पाच वर्षापुर्वी पुणतांबा गावातुन राज्यव्यापी शेतकरी संपाची हाक देण्यात आली होती.

शेतकरी संपाला राज्यभर प्रतिसाद देखील मिळाला होता. त्यामुळे सोमवारी (दि. २३) होणारी ग्रामसभा महत्वाची ठरणार आहे. यंदा अद्याप शेकडो शेतकऱ्यांचा ऊस शेतात पडून आहे. तोड मिळत नसल्याने शेतातच ऊस वाळून जात आहे.

विविध प्रश्नांनी त्रस्त झालेला शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतीसाठी पुरेशा प्रमाणात वीज मिळत नाही. कांद्याला योग्य भाव मिळत नाही. ऐनवेळी खतांची कृत्रीम टंचाई होते. गव्हाची निर्यात थांबल्याने गव्हाला चांगला दर मिळत नाही.

दुधाचे दर घसरल्याने दूध धंदा अडचणी सापडला आहे, अशा एक ना अनेक शेती निगडीत समस्या उद्भवल्या असून केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे डोळेझाक करत आहे.

त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी राज्यभर आंदोलन पुकारण्याची तयारी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत आंदोलनाची पुढील दिशा सोमवारी आयोजित विशेष ग्रामसभेत ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe