अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना एप्रिल महिन्याचे नियमित वेतन अदा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन द्यावा, किंवा उणे प्राधिकरणाद्वारे नियमित वेतन अदा करण्यासाठी मान्यता प्रदान करावी,
तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील काही शिक्षकांचे मार्च महिन्याचे थकलेले वेतन त्वरीत अदा करण्यासाठी नियोजन करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार, शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर व कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वित्तमंत्री अजित पवार व शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना दिले असल्याची माहिती बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना प्रत्येक महिन्याचे वेतन एक तारखेला अदा करण्याचा धोरणात्मक निर्णय कल्याणकारी महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. वेतनासाठी निधी उपलब्ध न झाल्यास उणे प्राधिकरणाद्वारे एक तारखेलाच वेतन अदा करण्याचे सुद्धा घोषित केले आहे. परंतु शासनाच्या घोषणेची अंमलबजावणी प्रशासन करीत नसल्यामुळे शासनाची प्रतिमा मलीन होत आहे.
तर शिक्षकांना वेळेवर वेतन मिळण्यास विलंब होत आहे. एप्रिलच्या नियमित वेतनासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे केली आहे. परंतु वित्त विभागाने मागणीनुसार शिक्षण विभागाला निधी दिलेला नाही. तसेच प्राधिकरणाद्वारे नियमित वेतन अदा करण्यासाठी मान्यता देखील प्रदान केली नाही.
शिक्षकांना वेळेवर वेतन मिळण्यासाठी संघटनेच्या वतीने वेळोवेळी प्रशासनाशी पाठपुरावा सुरु आहे. तर अनेकवेळा निवेदन देऊन आंदोलन देखील करण्यात आले आहे. शिक्षकांच्या वेतनाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट करुन, राज्यातील लाखोंच्या संख्येने शिक्षक व त्यांचे कुटुंबीय एप्रिलच्या वेतनापासून वंचित झाले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शिक्षकांना वेळेवर वेतन मिळण्यासाठी आवश्यक निधी तात्काळ वेळेत उपलब्ध करून द्यावा किंवा उणे प्राधिकरणाद्वारे नियमित वेतन अदा करण्यास मान्यता प्रदान करण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. शिक्षकांना नियमित व वेळेत वेतन मिळण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, प्रा.सुनिल पंडित,
शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, सखाराम गारूडकर, अशोक झिने, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, सौ. अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, इकबाल काकर, निलेश बांगर,
नितीन म्हस्के, महादेव देवकर, अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, प्रविण उकीर्डे, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, सत्यवान थोरे, प्रदीप बोरूडे, युनूस शेख आदी प्रयत्नशील आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|