अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 Soybean price :- राज्यातील शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून सोयाबीन या खरिपातील मुख्य पिकाकडे वळू लागले आहेत. खरिपातील हे मुख्य पीक लागवड करण्यासाठी आवश्यक उत्पादन खर्च इतर पिकांच्या तुलनेत कमी असल्याने शेतकरी बांधव या पिकाच्या लागवडीकडे वळू लागले आहेत.
सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव अस्मानी संकटांशी दोन हात करीत मोठ्या कष्टाने सोयाबीनचे उत्पादन घेत असतो. मात्र आता सोयाबीनच्या उत्पादनानंतर शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी करणारे व्यापारी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे उघडकीस आले आहे.
जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला सोयाबीन खाजगी व्यापाऱ्यांना विक्री करीत आहेत. हे व्यापारी माल खरेदी केल्यानंतर लगेच पैसा देत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी त्यांच्याकडे आकृष्ट होत आहेत.
मात्र, यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्यांचा तोटा होतं आहे. सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांद्वारे एका क्विंटल मागे तीन किलोची कपात केली जात आहे. यामागे युक्तिवाद करताना व्यापारी सांगतात की हा एक नियमच आहे.
विशेष म्हणजे असे अनेक व्यापारी करतात त्यामुळे शेतकरी बांधवांना देखील त्यांचा युक्तीवाद खरा वाटतो. एवढेच नाही हे खाजगी व्यापारी घाईघाईने वजन काटा करतात आणि मग किलोमागे जे वरील 500 ते 700 ग्रॅम वजन भरते ते गृहीत धरले जात नाही.
प्रत्येक कट्ट्यामागे दोन किलो वजन कमी केले जाते. शिवाय आमच्याकडून मोठे व्यापारी तीन किलो क्विंटलमागे कपात करत असल्याची बतावणी करत पुन्हा एकूण वजनाच्या तीन किलो क्विंटल मागे याप्रकारे कपात केली जाते. एकंदरीत जुन्नर तालुक्यातील खाजगी सोयाबीन खरेदी करणारे व्यापारी शेतकऱ्यांची लूट करीत आहेत.
एवढेच नाही जर सोयाबीनमध्ये घाण कचरा आढळला तर कट्ट्या मागे परत तीन किलोची कपात ठरलेलेच आहे. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार केली की लगेच संबंधित शेतकऱ्याचे नाव आणि गाव विचारले जाते आणि गावातील प्रतिष्ठित माणसांची ओळख दाखवली जाते.
अशा वेगवेगळ्या पद्धतीने सोयाबीन खरेदी करणारे व्यापारी जुन्नर तालुक्याच्या सोयाबीन उत्पादक शेतकर्यांची लूट करत आहेत. सोयाबीन विक्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना फसवणुकीची जाणीव झाली आणि संबंधित शेतकऱ्यांनी गैरव्यवहाराबाबत विचारणा केली की हे व्यापारी दमदाटी करत असल्याचा प्रकार बघायला मिळत आहे.
एवढेच नाही या खासगी व्यापाऱ्यांकडून पक्के बिल दिले जात नाही. यामुळे बाजार समिती आमचा व्यापाऱ्यांशी कुठलाच संबंध नाही असे सांगते यामुळे शेतकरी राजा पुरता हतबल होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारात सोयाबीन विक्री करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.