अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांमध्ये तालुका क्रीडा संकुले उभी राहिली. असे असताना अद्यापही श्रीरामपूरला तालुका क्रीडा संकुल मिळालेले नाही. ही खेदजनक बाब आहे.श्रीरामपूर तालुक्यातील तरुणांना व्यायाम करण्यासाठी मैदान नाही. पोलिस व लष्करात भरतीसाठी प्रयत्न करणारे अनेक तरुण आहेत.
त्यांनाही कोणतीही सुविधा तालुक्यात नाही. ही अडचण दूर करण्यासाठी लवकरच तालुका क्रीडा संकूल उभारणार आहोत, अशी माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली. आमदार लहू कानडे यांनी तहसीलदार प्रशांत पाटील, बांधकाम विभागाचे अभियंता नितीन गुजरे, तालुका क्रीडा समितीच्या सदस्यांसह जागेची पाहणी केली.
तहसीलदार, पोलिस निरीक्षक, गटशिक्षणाधकिारी, शिक्षक प्रतिनिधी असे या समितीचे सदस्य आहेत. समिती सदस्यांनी यावेळी सूचना केल्या. ग्रामीण रुग्णालयाशेजारील सहा एकर जागा उपलब्ध आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची ही जागा आहे. याच जागेवर क्रीडा संकूल उभे केले जाईल.
खेळाडूंना सर्व आधुनिक सुविधा तेथे प्रदान करणार आहोत. खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था केली जाणार आहे. प्रशिक्षक देण्याचा प्रयत्न आहे, असे कानडे म्हणाले. राज्याचे युवक व क्रीडा मंत्री सुनील केदार यांचेकडे पाठपुरावा करून लवकर काम पूर्ण करू, अशी ग्वाही तालुकाक्रिडा समितीच्या बैठकित आमदार कानडे यांनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम