खासदार निलेश लंकेंच्या तालुक्यात येणार श्रीलंकेचा मुथय्या ! एमआयडीसीत साकारणार सर्वात मोठा प्रकल्प 

Ahmednagarlive24
Published:
देशात सर्वाधिक झपाट्याने विकसित होत असलेल्या सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीची श्रीलंका क्रिकेट टीमचा यशस्वी फरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याला भुरळ पडली असून या औद्योगिक वसाहतीमधील सर्वाधिक गुंतवणूक असलेला प्रकल्प मुथय्या हा उभारणार आहे. येत्या एप्रिल महिन्यात या प्रकल्पाच्या उभारणीस प्रारंभ होणार असल्याची माहीती राज्याच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या सुत्रांकडून देण्यात आली. या प्रकल्पासाठी १ हजार ६३५ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून या कंपनीमध्ये विविध शितपेयांसाठी  लागणाऱ्या कॅनची निर्मिती होणार आहे.
श्रीलंकेच्या क्रिकेट टीममधून निवृत्ती घेतल्यानंतर मुथय्या मुरलीधरन याने सिलोन बेव्हरेजेस या उद्योग समुहाची उभारणी केली असून विविध ठिकाणी असलेल्या प्रकल्पांबरोबरच मुथय्या याने त्याच्या उद्योगाचा विस्तार वाढवत आला थेट सुप्याच्या  एमआयडीसीमध्ये पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्योगासाठी ३५ एकर जमीनीची मागणी करण्यात आली असून त्यातून ४५५ तरूणांना रोजगाराची निर्मिती होणार आहे.
औद्योगिक विकास महामंडळाकडे मुथय्या मुरलीधरन याच्या कंपनीकडून जागेचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर  मायनर मॉडीफीकेशन कमिटीच्या बैठकीत भुखंड वितरणाबाबत चर्चा करण्यात आली. या कमिटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्याचे उद्योग मंत्रालय पुढील प्रक्रिया पार पाडून येत्या एप्रिल महिन्यापासून या उद्योगाच्या बांधकामाला परवानगी देणार असल्याचे उपप्रादेशिक अधिकारी डी.आर. काकडे यांनी सांगितले.
कशाची निर्मिती होणार ?
शितपेये, उर्जापेये, तसेच खनिज पाण्याचे कॅन तयार करणे व ते त्यात भरून देणे हे काम या कंपनीकडून करण्यात येणार आहे. लवकरच या उद्योग समुहास भुखंड प्रदान करण्यासंदर्भात औद्योगिक विकास महामंडळाकडून पहिल्या टप्प्याची रक्कम भरण्यासंदर्भात अधिकृत पत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सुरूवातीस २५ टक्के रक्कम आदा करण्यात आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ७५ टक्के रक्कम घेण्यात येईल. त्यानंतर सिलोन बेव्हरेजेस कंपनीस भुखंड हस्तांतरीत करण्यात येणार आहे. १ लाख ४० हजार स्क्वेअर मीटर जागा या प्रकल्पासाठी लागणार आहे.
एप्रिलपासून प्रकल्पाची उभारणी
मुथय्या मुरलीधरनच्या या प्रकल्पाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर भुखंडासंदर्भात समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रकल्पास भुखंड देण्यासंदर्भात मंजुरी देण्यात आली असून बैठकीचे इतिवृत्त उद्योग मंत्रालयास सादर करण्यात आले आहे. आता औद्योगिक विकास महामंडळाकडून  मुथय्याच्या उद्योग समुहास ऑफर लेटर देण्यात येईल. त्यानंतर साधारणतः एप्रिल महिन्यात या प्रकल्पाच्या उभारणीस प्रारंभ होईल.- डी.आर.काकडे उपप्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी
 सर्वाधिक गुंतवणूक असणारा प्रकल्प
सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीच्या म्हसणे फाटा विस्तारीत वसाहतीमध्ये सन २०१८ मध्ये कॅरिअर मायडिया या कंपनीच्या माध्यमातून एका मोठया कंपनीची मुहूर्तमेढ झाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कंपनीचे भुमिपुजन केले होते. त्यानंतरच्या आठ वर्षात या विस्तारीत वसाहतीमध्ये ३३ उद्योग सुरू झाले. सरत्या वर्षाअखेर या वसाहतीमध्ये ५ हजार १८६ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली. त्यातून १० हजार ५८४ तरूणांना रोजगार मिळाला. सिलोन बेव्हरेजेसच्या माध्यमातून तब्बल १ हजार ६३५ कोटी रूपयांची गुंतवणूक असणारा सर्वाधिक मोठा प्रकल्प या वसाहतीमध्ये उभारला जाणार आहे. कॅरिअर मायडिया या कंपनीने या वसाहतीमध्ये ८०० कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे.
काय आहे कंपनीची पार्श्वभुमी ?
सन २०२० मध्ये सिलोन बेव्हरेजेस या मुथय्या मुरलीधरनच्या कंपनीची स्थापना झाली. एका कंपनीचे पेय व ते भरून देण्याचे काम या कंपनीमार्फत सरू करण्यात आले. आज श्रीलंका तसेच जगभरातील शीतपेय कंपन्यांना कॅनचा पुरवठा ही कंपनी करते. या कंपनीच्या मिनरल वॉटर, एनज ड्रिंक, सॉफट ड्रिंक, हॉट फिल ज्युस तसेच कॅनमधील फ्लेवर्ड दुधाची निर्मिती करणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा त्यात समावेश आहे. सिलोन बेव्हरेजेसच्या प्रकल्पाची दरवर्षी ३०० दशलक्ष पेय कॅन तयार करण्याची तसेच ते भरून देण्याची क्षमता आहे.
अप्रत्यक्ष अंबानींचाही ऐंन्ट्री !
देशातील प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कझयुमर प्रॉडक्टसाठी श्रीलंकेतून कॅम्पा कॅनची आयात करण्यात येते. सिलोन बेव्हरेजेस इंटरनॅशनलने रिलायन्सच्या उत्पादनांसाठी सुप्यात हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतल्याने सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीतमध्ये अप्रत्यक्ष अंबानी उद्योग समुहाचीही ऐंट्री झाली आहे.
विरोधकांना चपराक !
सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या पाच ते सात वर्षात अनेक आंतरराष्ट्रीय उद्योग उभारले गेले आहेत, काही उद्योगांची उभारणी सुरू आहे. हजारो तरूणांना तिथे रोजगार मिळाला आहे. देशातील सर्वाधिक झपाटयाने विकसीत होणारे औद्योगिक क्षेत्र म्हणून या वसाहतीकडे पाहिले जात आहे. या वसाहतीमधील उद्योजकांना संरक्षण देण्याचे काम आम्ही करतो. दहशत दादागीरी करणारांचा बंदोबस्त करतो. श्रीलंकेचे महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांच्या कंपनीकडून सुप्याच्या औद्योगिक वसाहतीस प्राधान्य दिले हे या वसाहतीमधील औद्योगिक शांततेचे प्रतिक आहे. या वसाहतीमधील दहशत, दादागिरीबाबत विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या आवईला ही सनसणीत चपराक आहे. या वसाहतीमध्ये उद्योग उभारणीसाठी अनेक आंतरराष्ट्रीय उद्योग समुह उत्सुक असून ते आपल्या संपर्कात आहेत. लवकरच ही वसाहत देशातील सर्वाधिक मोठी औद्योगिक वसाहत असेल.  – खासदार नीलेश लंके लोकसभा सदस्य
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe