अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न होत आहे.
त्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात राहून बाधित रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळावे यासाठी ३५० बेडचे सुसज्ज कोविड केअर सेंटर सुरु करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिल्या आहेत.
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कोरोनाची लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांच्या संख्येत रोज शेकडोने भर पडत असल्यामुळे एस.एस.जी.एम.महाविद्यालयात सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये बेडसंख्या कमी पडत आहे.
त्यामुळे अनेक बाधित रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. तसेच कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात बाधित गंभीर रुग्ण उपचार घेत असून त्याठिकाणी देखील रुग्णांची संख्या वाढत आहे
त्यामुळे बाधित रुग्णांसाठी नवीन कोविड केअर सेंटर सुरु करणे गरजेचे होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार आशुतोष काळे यांनी त्याबाबत तहसीलदार योगेश चंद्रे यांना सूचना दिल्या.
त्या सूचनेनुसार कोपरगाव शहर व परिसरातील बाधित रुग्णांना उपचार घेण्याच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावे यासाठी कोपरगाव शहरापासून जवळच असलेल्या आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या वसतिगृहाची तहसीलदार योगेश चंद्रे यांनी पाहणी केली.
या वसतिगृहात ३५० बेडचे सुसज्ज कोविड केअर सेंटर चांगल्या प्रकारे सुरु होवू शकते याची खातरजमा करून तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आरोग्य विभागाला या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरु करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार या ठिकाणी लवकरच सुसज्ज कोविड केअर सेंटर सुरु होणार आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|