अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेनअंतर्गत कडक निर्बंध लागु करण्यात आले आहेत. या आदेशानुसार साईबाबा संस्थानचे प्रसादालय बंद करण्यात आले असल्याने गोरगरीब व सामान्य कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
किमान दोन वेळचे जेवण पार्सल मिळावे, यासाठी शिर्डीत शिवभोजन थाळी केंद्र तातडीने सुरू करावे, अशी मागणी गणेश कोते यांनी केली आहे. शिर्डीत रोजंदारीच्या शोधात राज्यासह परराज्यातील अनेकजण आले आहेत.
या ठिकाणी बांधकाम, सेंट्रींग किंवा मिळेत ते काम हे कर्मचारी करत असतात. यापुर्वी संस्थानचे प्रसादालय सुरु होते.
हे कर्मचारी या ठिकाणी जेवण्यासाठी जात असत; मात्र ५ एप्रिलपासुन प्रसादालय बंद करण्यात आल्याने हॉटेलमधुन पार्सल घेऊन अर्धपोटी उपाशी राहून जीवन जगण्याची वेळ आली आहे.
काही जणांकडे पैसे नसल्याने त्यांना तर अक्षरश: उपाशी रहावे लागत आहे. हॉटेलमधील जेवण परवडत नाही.
सकाळ व संध्याकाळ किती पैसे खर्च करायचे व घरी मुलाबाळांना काय पाठवायचे? दिवसभरात मिळालेली रोजंदारी चहा, नाष्ता, जेवण यासाठी खर्च होत असल्याने आम्ही जाम वैगातलो असल्याचे एका बांधकाम कर्मचाऱ्याने सांगितले.
राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शिवभोजन थाळी पार्सल स्वरुपात देण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना काळात मजूर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेस ही थाळी मोठा आधार ठरत आहे; मात्र शिर्डीत शिवभोजन केंद्र नसल्याने
ही योजना शासनाने सुरु करुनही त्याचा लाभ जनतेस घेता येत नाही. शिर्डीत कोरोना महामारीच्या काळात तरी शिवभोजन थाळी केंद्र सुरु करुन गोरगरीबांची भुक भागवावी, अशी अपेक्षा कोते यांनी व्यक्त केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|