अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- महाराष्ट्राला हादरवणारी घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपूरी येथे घडली आहे. लग्नाला तयार नसल्याने मुलीच्या डोक्यात खोरे घालून पित्यानेच तिचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.
खुनानंतर चौघांच्या मदतीने पित्याने मुलीचा अंत्यविधी उरकून घेतला. मात्र, मृतदेह अर्धवट जळल्याने तो मध्यरात्रीच दफन करण्यात आला.
दरम्यान, आठ दिवसांनंतर हा प्रकार उघडकीला आला असून, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ताई उत्तम चौगुले (वय 18) असे मृत मुलीचे नाव असून, उत्तम महादेव चौगुले (वय 42) याला अटक केली आहे.
सांगलीच्या आटपाडी येथे उत्तम चौगुले हा बनपुरी येथे पूर्वेला चौगुले वस्तीवर कुटुंबीयांसोबत राहतो. १३ मार्चला तारखेला शनिवारी रात्री त्यांच्या घरी हा प्रकार घडला. १४ मार्चला मुलीला पाहण्यासाठी पाहुणे येणार होते. मात्र मुलगी लग्नाला नकार देत होती. आत्ताच लग्न नको असा आग्रह ती करत होती.
यावरून रात्री दोघांमध्ये मोठ वाद झाला. यातूनच रागाच्या भरात उत्तम चौगुले याने बेडग्याने मुलीला बेदम मारले. यावेळी डोक्यावर मार बसल्यामुळे मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर घरात स्वच्छता करून, शेजाऱ्यांसमोर मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव केला. वस्तीवरची अनेक माणसं अंत्यविधीसाठी जमा झाली होती. अनेकांना ही घटना संशयास्पद वाटली. त्यामुळे बहुतांश साऱ्यांनीच काढता पाय घेतला.
यानंतर आरोपी उत्तम चौगुले याने इतर चौघांना सोबत घेऊन घराशेजारीच असलेल्या ओढापात्रात शेतातील लाकडे गोळा करून मध्यरात्री अंत्यविधी केला. प्रेत अर्धवट जळल्यामुळे पहाटे ते ओढा पात्रातच दफन केले.
तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जनही केले नाही. या घटनेची गावात उलट सुलट चर्चा चालू होती. अखेर आज पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन संशयित आरोपी उत्तम चौगुले याला ताब्यात घेतले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|