अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :-पारनेरच्या तहसिलदार श्रीमती ज्योती देवरे यांची स्थानिक लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कामात अडथळा निर्माण करुन महिला अधिकारी म्हणून अवहेलना व कुचंबना होत असल्याबाबतचे जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्यावतीने निवेदन देऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीमती ज्योती देवरे तहसिलदार पारनेर, जि.अहमदनगर यांचे दिनांक 16/8/2021 रोजी निवेदन प्राप्त झाले असून, सदर निवेदनात त्यांनी महिला अधिकारी म्हणून कुचंबना व अवहेलना होत असल्याचे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून कामकाजा दरम्यान प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अडथळा निर्माण केला जात असल्याचे नमुद केले आहे.
अशाप्रमारे एखाद्या क्षेत्रीय स्तरावर काम करणार्या महिला अधिकार्यांची कुचंबना व अवहेलना होण्याच्या घटनेचा महाराष्ट्र राज्य तहसिलदार वनायब तहसिलदार संघटना तीव्र निषेध व्यक्त करीत आहे. उक्त प्रकरणाचे अवलोकन केले असता एका कर्तव्यदक्ष महिला अधिकार्यांविरोधात मर्जीने कामे न केल्याने तसेच त्यांचेवर वचक निर्माण करण्याचे अनुषंगाने त्यांचेवर दबाव टाकून, वरिष्ठांमार्फत पाहिजे
तशी चुकीच्या पद्धतीने चौकशी करुन कारवाईचा प्रस्ताव शासनास पाठविल्याचे दिसून येते. तसेच इतर लोकांकडून तक्रारी लिहून घेऊन गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे, त्यांचेवर खोट्या तक्रारी करुन कारवाईचा धाक दाखवून त्यांच्यावर प्रभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने वरिष्ठांना कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यास बाध्य केल्याचे दिसून येते. ही निश्चितच गंभीर बाब आहे.
यापूर्वी सुद्धा नजीकच्या काळातच अशा प्रकारे अनेक महिला अधिकारी व इतर अधिकारी यांचेविरोधात केवळ लोकप्रतिनिधींच्या मर्जीने कामे न केल्यामुळे वरिष्ठांवर दबाव टाकून पाहिजे, तशा प्रकारच्या चौकशी करुन कारवाईचे प्रस्ताव पाठविल्याचे दिसून आले आहे.
यामुळे निश्चितच महिला अधिकारी व इतर अधिकारी यांचे मनोधैर्य खच्चीकरण होत असून, अशा घटनांमधून प्रसंगी महिला अधिकार्यांचे करिअर संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणी राज्यस्तरावरुन वरिष्ठ महिला अधिकार्यांचा समावेश असलेली स्वतंत्र समिती तात्काळ स्थापन करुन या समितीमार्फत पारदर्शक चौकशी करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणी चौकशी पारदर्शक न झाल्यास संघटनेस नाईलाजस्तव आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल याची कृपया नोंद घेण्यात यावी. या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 23/8/2021 रोजी सकाळी 11 वा. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित येवून काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी घेतला आहे.
तरी सदर प्रकरणी राज्यस्तरावरुन वरिष्ठ महिला अधिकार्यांची स्वतंत्र समिती 7 दिवसाचे आत स्थापन करुन प्रकरणाची पारदर्शक चौकशी तात्काळ पुर्ण करुन समस्त महिला अधिकारी यांना न्याय देण्यात यावा, ही विनंती. उपरोक्त प्रमाणे राज्यस्तरावरुन वरिष्ठ महिला अधिकार्यांची स्वतंत्र समिती 7 दिवसाचे आत स्थापन न झाल्यास याबाबत महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम