अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- वर्षानुवर्षे साईबाबांच्या झोळीतून मोठा निधी मिळवणार्या शिर्डी नगरपंचायतीने वसुली मोहीम थांबवून शहरातील नागरिकांचे सर्व प्रकारचे कर व गाळा भाड़े पूर्णपणे माफ करून
शिर्डीकारांना दिलासा देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा शिर्डीकरांच्या मोठ्या उद्रेकाचा सामना नगरपंचायत प्रशासनाला करावा लागेल, असा इशारा प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी दिला.
साईबाबा मंदिर अनलॉक होऊनही करोनाच्या भीतीमुळे गेल्या वर्षभरापासून शिर्डीत भाविकांची संख्या कमालीची घटत चालल्याने शिर्डी शहरातील व्यावसायिक आणि नागरिकांना सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शिर्डीत अर्थव्यवस्था पूर्णपणे भाविकांवर अवलंबून आहे.
शेकडो कोटींचे बँकांकडून कर्जे घेऊन लहान-मोठ्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत. मात्र वर्षभरापासून करोनाच्या भितीमुळे शिर्डीत येणार्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर रोडावली असल्याने लहान मोठ्या व्यवसायाप्रमाणेच हॉटेल व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत.
व्यावसायिकांच्या डोक्यावर मोठे कर्ज असून त्या कर्जाचे वर्षभरापासून हप्ते थकलेले आहेत. बँकांनी थकित कर्ज हप्त्यांच्या वसुलीसाठी तगादा लावलेला आहे. बँकाचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत नागरिक व व्यावसायिक असताना आता शिर्डी नगरपंचायतीने कर आणी गाळे भाड़े वसुलीसाठी मोहीम सुरू केली आहे.
गेल्या दीड महिन्यात आर्थिक कारणाने शिर्डी परिसरात 11 आत्महत्या झालेल्या आहेत. याचे भान ठेवून शिर्डी नगरपंचायतीने सर्व प्रकारची वसुली मोहीम थांबवून वर्षभरातील सर्व मालमत्ता कर व गाळाभाडे माफ करण्याचा निर्णय घ्यावा.
शिर्डीकर उद्भवलेल्या आर्थिक महाभयंकर संकटातून व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी शिर्डी नगरपंचायतीच्या प्रशासनाने तातडीने सर्व प्रकारच्या मालमत्ता करांची व गाड़े भाड्यांची सुरू केलेली पठाणी वसुली थांबवावी, असे आवाहनही कैलासबापू कोते यांनी केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|