…तर आठ दिवसांत राज्यात पुन्हा कठोर निर्बंध !

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- ब्रेक द चेन निर्बंध शिथील करण्याबाबत घाईने वक्तव्य करून चर्चेत आलेले राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यानी पुन्हा एकदा गंभीर विधान करत सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

पुण्यात ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध सैल केल्यांनतर रूग्ण संख्या अद्यापही काही जिल्ह्यात वाढत असल्याचे दिसत असल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे येत्या आठ दिवसांत याबाबत राज्य सरकारला पुन्हा एकदा कठोर पावले टाकावी लागू शकतात असे संकेत त्यांनी दिले आहेत. राज्यातील निर्बंध सैल केल्याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘कालची आकडेवारी पाहता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी आणि नवीन रुग्णांची संख्या अधिक होती.

तरीही आजच यावर ठोस असे भाष्य करता येणार नाही. पुढचे आठ दिवस या परिस्थितीत काय बदल होतात ते पाहावे लागेल. सध्या काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या हळूहळू वाढत असल्याचे दिसत आहे. आपण सवलती व काही प्रमाणात सूट दिल्यानंतरचा हा बदल आहे.

अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली तर मात्र एकंदर स्थितीचा आढावा घेऊन अनेक निर्बंध नव्याने लावावे लागतील’, अशी शक्यता वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. मात्र याबाबत पुढच्या आठवड्यात आढावा घेवून पाऊले उचलण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe