विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत शैक्षणिक प्रगती करावी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- सध्या कोरोनामुळे सर्व शिक्षण ऑनलाईन झाले आहे, हे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसाठी नवीन असले तरी ती काळाची गरज बनली आहे.

त्यामुळे भविष्याचा विचार करुन हे तंत्रज्ञान आत्मसात करुन आपली प्रगती करुन घ्यावी. विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे त्यांचे स्वत:चे असले तरी शिक्षक-पालक यांचाही यामध्ये मोठा वाटा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या यशाने हुरळून न जाता आणखी प्रगती करावी, यश संपादन करावे.

आपल्या यशाचे कौतुक हे आपल्या स्वकियांनाही असते. त्याच उद्देशाने आज साळी माता सहाय्यता कक्षाच्यावतीने आपला सत्कार करुन आपणास प्रोत्साहन व प्रेरणा देण्याचे काम केले आहे. आपणही सामाजिक बांधिलकी जोपासत शैक्षणिक प्रगती करावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक सोमनाथ खाडे यांनी केले.

साळी माता सहाय्यता कक्षाच्यावतीने इ.10 वी उर्त्तीण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गणेश झिंजे, किरण डफळ, सोमनाथ खाडे, अरुण दळवी, अविनाश झिकरे, प्रताप मारवाडे, शामसुंदर दळवी, ज्ञानेश्वर फासे आदि मान्यवर उपस्थित होते.

जय जिव्हेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण डफळ म्हणाले, साळी माता सहाय्यता कक्षाच्यावतीने समाजातील गरजूंना शैक्षणिक, वैद्यकीय स्वरुपाची मदत केली जाते. त्याचप्रमाणे महिलांना शिलाई मशिन देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम केले आहे. समाजातील गरजूंच्या अडचणी सोडविण्याचे काम करत असते.

यापुढील काळातही असेच उपक्रम राबविले जातील. त्यासाठी समाजातील मान्यवरांनीही सहकार्य करावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमास मृणाल कनोरे, सुषमा साळी, स्नेहल कौसल्ये, सुरेश इंगळे, तुकाराम कांबळे, सुभाष पाठक, संजय मते, नंदकुमार सुपेकर, अभिजित अष्टेकर, सचिन भागवत, आशिष आचारी, ओंकार मिसाळ, सुमित ढोकळे आणि सर्व समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी साई सेवा प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष गणेश झिंजे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना वही वाटप तसेच जेष्ठांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. अविनाश झिकरे यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह (ट्रॉफी) प्रदान करण्यात आले.

तसेच जय जिव्हेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने किरण डफळ यांच्या हस्ते सर्वांना जिव्हेश्वरी ग्रंथ देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण दळवी यांनी केले. तर प्रकाश मारवाडे यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास जय जिव्हेश्वर प्रतिष्ठान, साई सेवा प्रतिष्ठान आणि जिव्हेश्वर भक्त सेवा मंडळ या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News