परीक्षा रद्दच्या निषेधार्थ विद्यार्थी उतरले रस्त्यावर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- एमपीएससीची परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानकपणे रद्द करण्यात आली. या निर्णयाविरोधात नगरमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. परीक्षा रद्द केल्याचा निषेध म्हणून शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा नगर शहरात काढण्यात आला.

दरम्यान, निषेध करणार्‍या 12 विद्यार्थ्यांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. समज देऊन त्यांना नंतर सोडून देण्यात आले. बालिकाश्रम रस्ता येथून विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने करत हा मार्च काढला.

आंदोलक विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चा निलक्रांती चौका मध्ये आला त्यावेळी आंदोलकांनी रास्ता रोको करण्याची भूमिका घेतली.

तथापि, पोलिस प्रशासनाच्या आवाहनानंतर, सामंजस्य दाखवत विद्यार्थ्यांनी निलक्रांती चौकात ठिय्या मांडला. आंदोलकांच्या भावना सरकार आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी किरण काळे यांनी आंदोलन सुरू असतानाच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दूरध्वनीद्वारे आंदोलकांच्या भावना सांगितल्या.

या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यानंतर सायंकाळी 15 ते 20 विद्यार्थ्यांनी दिल्लीगेट येथे आंदोलन करत घोषणाबाजी केली. त्याठिकाणी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. त्यांनी 12 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe