कांद्याची अचानक तीव्र टंचाई ! ह्या देशाची भारतातून पुन्हा कांद्याची आयात सुरू

Onion Prices : सणासुदीच्या आधी वाढत्या देशांतर्गत मागणीची पूर्तता करण्यासाठी नेपाळमधील व्यापाऱ्यांनी भारतातून कांद्याची आयात पुन्हा सुरू केली आहे. भारताने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्यानंतर त्याचा पुरवठा थांबवण्यात आला होता.

केंद्र सरकारने कांद्यावर आकारलेल्या ४० टक्के निर्यात शुल्काचा नेपाळवर गंभीर परिणाम झाला. भारताने भाजीपाला निर्यात शुल्क लादल्यानंतर नेपाळमधील व्यापार्‍यांनी सोमवार आणि मंगळवारी कांद्याची आयात बंद केली होती. येथील किरकोळ बाजारात कांदा ७० रुपये किलोने विकला जात होता. पण निर्यात कर आकारणीनंतर कांद्याचा भाव १०० रुपये किलोवर जाऊन पोहचला.

कृषी उत्पादनांसाठी हिमालयातील देशातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालीमाटी ‘फळे आणि भाजीपाला बाजारपेठेत अनेक व्यापार्‍यांनी कांद्याची अचानक तीव्र टंचाई जाणवत असल्याचे म्हटले आहे.

नेपाळ आपल्या गरजेपैकी ९९ टक्के कांदा भारतातून आयात करतो. नेपाळमधील व्यापार्‍यांनी गेल्या ४८ तासांत भारतातून २६५ टन कांद्याची आयात केली, ज्यामुळे सणासुदीच्या आधी भाजीपाल्याचा सुरळीत पुरवठा सुरू होण्यास मदत झाली.

बुधवारी भारतातून १२० टन कांद्याची आयात झाली असून, गुरुवारी दुपारपर्यंत १४५ टन कांद्याची आवक झाली आहे. केंद्र सरकारने २१ डिसेंबरपर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारले आहे. सणांच्या काळातच हे निर्यात शुल्क आकारण्यात आल्याचे मत येथील व्यापाऱ्यांनी व्यक्‍त केले आहे.

कर समायोजनानंतर कांद्याची घाऊक किंमत ७५ रुपये प्रतिकिलो निश्‍चित करण्यात आली आहे. आता पुरवठा सुरळीत असल्याने बाजारात कांद्याची कमतरता नसल्याचे ‘कालीमाटी फळ व भाजीपाला बाजार विकास मंडळाचे प्रवक्ते बिनय श्रेष्ठ यांनी सांगितले.