अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व पोलिस अधिक्षक मनोज पाटील हे दोन्ही अधिकारी आता थेट फिल्डवर उतरले आहेत. आज त्यांनी अचानक विविध सरकारी कार्यालयांसह बाजारपेठेत भेटी दिल्या. कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता विना मास्क असलेल्यांना जागेवर दंड ठोठावला.
जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे मात्र अनेकांची गाळण उडाली. मागील काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा चांगलीच उचल घेतली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण वाढू लागले आहे. हे लक्षात घेत जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी वेळोवेळी नियमित आढावा बैठका घेत प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रशासकीय यंत्रणांना गतिमान केले आहे. तसेच ‘मी जबाबदार’ या संकल्पाची जाणीव करून देत जिल्हावासीयांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून निरंतर सुरु आहे.
मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसह अनेक नागरिकांना उपाययोजनांचे गांभीर्य जाणवत नसल्याचे अनेकदा प्रत्ययास आले होते. नुकताच राज्याच्या मुख्य सचिवांनी कोरोनाविषयक परिस्थितीचा व्हीसीद्वारे आढावा घेतला. या बैठकीनंतर अचानक प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या वस्तुस्थितीचे निरीक्षण करण्याची मोहीम हाती घेतली.
कापडबाजार, जिल्हा परिषद, स्वस्तिक बस्थानक तसेच जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरात पहाणी करीत विना मास्क आढळलेल्या नागरिक, दुकानदार, प्रवासी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना ५०० रुपये दंड केला. सरकारी कार्यालयाची झाडाझडती प्रत्यक्ष जिल्हाधिकारी घेत असल्याने अनेकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|