Shrigonda News : पदाचा गैरवापर करत संचालक मंडळाच्या परस्पर स्वतःचा ‘पगार वाढविल्याचा ठपका ठेवत श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांच्यावर तत्काळ सेवेतून निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी सभापती अतुल लोखंडे यांना दिले आहेत. याबाबत सोमवारी(दि.५) होणाऱ्या बाजार समितीच्या मासिक सभेत हा विषय अजेंड्यावर घेण्यात आला आहे.
बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्याकडे सचिव दिलीप डेबरे यांच्या कारभाराच्या चौकशीची मागणी केली होती. त्या मागणीनुसार जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी राहत्याचे सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.
खेडकर यांनी सादर केलेल्या अहवालात सचिव दिलीप डेबरे यांच्यावर पगार वाढवून घेतल्यासंबंधी ठपका ठेवण्यात आला आहे. चौकशी अधिकारी रावसाहेब खेडकर यांनी सदर अहवाल जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांना सादर केला.
चौकशी अधिकारी रावसाहेब खेडकर यांनी सादर केलेल्या अहवालातील निष्कर्षांप्रमाणे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी सचिव दिलीप डेबरे यांना तत्काळ निलंबित करावे, असे निर्देश देण्यात येऊन बाजार समितीला सोसावे लागलेल्या आर्थिक नुकसानीची वसुली दिलीप डेबरे यांच्याकडून व्याजाच्या प्रचलित दरानुसार करण्यात यावी.
त्याचबरोबर सचिव दिलीप डेबरे यांची महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास ‘व विनियन) अधिनियम १९६३ तसेच मंजूर उपविधी व सेवा नियमातील तरतुदीनुसार खातेनिहाय चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधक पुरी यांनी सभापती अतुल लोखंडे यांना दिले आहेत.
सोमवारी (दि.५) बाजार समितीची मासिक सभा होणार असून, या सभेच्या अजेंड्यावर जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या निर्देश पत्राचा हा विषय घेण्यात आला आहे. सदर, निर्देशाचा अनुपालन अहवाल ३० दिवसांच्या आत जिल्हा उपनिबंधक कार्यालयास सादर करण्याचे स्पष्ट निर्देश या पत्रात देण्यात आले आहेत.
जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी चौकशी अहवालातील निष्कर्षानुसार सचिव दिलीप डेबरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी दिलेल्या निर्दशाची अंमलबजावणी संचालकांच्या मासिक सभेत विषय घेऊन करणार आहोत: – अतुल लोखंडे, सभापती