अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-नगर जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिक देखील कोरोना चाचण्या करून घेण्यासाठी बाहेर पडू लागले आहे.
शासकीय कोविड सेंटर फुल असल्याने नागरिक खासगी दवाखान्यात कोरोना टेस्ट करू लागले आहे. यामुळे अवैध टेस्टचा सुळसुळाट झाला आहे. यावर कारवाई करण्याची मागणी मनसेने पारनेरच्या तहसीलदारांकडे केली आहे.
नगर शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहेत. अवैधरित्या करण्यात येणाऱ्या चाचण्यांमध्ये सकारात्मक अहवाल प्राप्त झालेल्या करोना बाधित रुग्णांची नोंद महसूल व आरोग्य प्रशासनाकडे करण्यात येत नाही.
असे रुग्ण सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरत असल्याने तालुक्यात करोना संसर्गाचा फैलाव वेगाने होत आहे.
त्यामुळे अवैधरित्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करणाऱ्या व्यक्तींवर,रुग्णालयांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसिम राजे यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खासदार डॉ.सुजय विखे यांची भेट घेऊन राजे यांनी यासंदर्भात प्रशासनाला सूचना देण्यात याव्यात अशी विनंती केली. दरम्यान या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मान्यता दिलेले रॅपिड अँटीजेन टेस्ट किट केवळ जिल्हा रुग्णालये,
उपजिल्हा रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांसह मान्यताप्राप्त कोविड उपचार केंद्रामध्ये उपलब्ध आहेत. या ठिकाणी करोना संसर्ग चाचणी करण्यात आलेल्या व सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णांची नोंद प्रशासनाकडे असते.
त्यामुळे संबंधित रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करणे, लक्षणे नसलेल्या रुग्णांना विलगीकरणात ठेवणे आदी प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे प्रशासनाला शक्य होते.
संसर्गाचा फैलाव रोखता येतो. दरम्यान पारनेर तालुक्यात करोना संसर्गाचा उद्रेक टाळण्यासाठी अवैधरित्या चाचण्या करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी वसिम राजे यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|