मेहेरबाबा ट्रस्टच्या विश्‍वस्तांवर कारवाई करा..!

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-  महार वतनाची ७२ एकर जागा बळकावल्याचा आरोप अहमदनगर : नगर तालुक्यातील व शहरा पासून जवळ असणाऱ्या अरणगाव येथे महार वतनाची ७२ एकर जागा अवैधरित्या बळकावून

त्यांच्यावर अन्याय करणार्‍या अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या विश्‍वस्तांवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. अरणगाव येथील मागासवर्गीय समाज व अवतार मेहेरबाबा ट्रस्टमध्ये ७२ एकर जागेचा वाद निर्माण झाला आहे. सदर जागा मागासवर्गीयांना महार वतनाखाली मिळाली असून, ट्रस्टच्यावतीने ती बळकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे.

महार वतनाच्या या जागेवर मेहेरबाबा ट्रस्टने खोटी कागदपत्रे सादर करुन अवैधरित्या कब्जा केला आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशनला तक्रार केल्याने ट्रस्टचे विश्‍वस्त गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरुन

या भागातील मागासवर्गीयांना धमकावण्याचा प्रकार सुरु केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वर्षानुवर्षे ही महार वतनची जागा मागासवर्गीयांच्या ताब्यात असून, ट्रस्टचा या जागेशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe