अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे भरदिवसा दोन ते तीन ठिकाणी घरफोडी झाली. यावेळी परिसरात संशयीतरित्या फिरणारऱ्या लोकांची गाडी अडवून त्यांची विचारपूस केली.
मात्र चोरी झालेल्यांसह इतर ग्रामस्थांवरच गुन्हे दाखल केले. सदरचे गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा वंजारवाडी येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वंजारवाडी व धानोरा येथे भरदिवसा घराचे कुलूप व कडी तोडून चोरी झाली होती. ही माहिती वंजारवाडी येथील ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या नंबरवर फोन करून सर्वांना माहिती दिली.
ही माहिती समजताच बाजूच्या परिसरातील लोकांनी संशयित व्यक्तींची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. सदर गाडी आरणगाव येथे अडवली.
त्या वेळी सदर संशयितांनी उलट-सुलट भाषा वापरत गाडी का थांबवली असे विचारून व विचारपूस करणाऱ्यास मारहाण केली. त्यामुळे संतापलेल्या जमावाची त्यांची बाचाबाची होवून त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या.
त्यानंतर वंजारवाडी येथील ज्या लोकांची चोरी झाली त्यांच्यासह वंजारवाडी व धानोरा ग्रामस्थांवरच गुन्हे दाखल केले आहेत. संशयित लोक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अन्यथा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम