अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- राहुरी येथील डॉ.तनपुरे कारखाना कामगारांच्या थकीत पगाराचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने दिवसेंदिवस कामगारांचे आंदोलन तीव्र होत असताना आता कामगारांच्या मुलांनी आंदोलनात उडी घेतली असून ३ सप्टेंबर रोजी राहुरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख यांना कामगारांच्या मुलांनी निवेदन दिले असून या निवेदनात म्हंटले की, घरातील कर्ते पुरुष आंदोलन करीत असल्याने, उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
घरात किराणा व अन्नधान्य संपल्याने उपासमार सुरू झाली आहे. दीड महिन्यापासून कारखान्याचा वीजपुरवठा खंडित असल्याने कामगार वसाहतीमध्ये अंधार आहे.
त्यामुळे, ऑनलाइन शिक्षणाचा खेळखंडोबा होऊन, कधीही भरून न निघणारे शैक्षणिक नुकसान झाले आहे. पालकांच्या उपोषण व आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी
येत्या शुक्रवार ३ सप्टेंबर रोजी आम्ही कामगारांची सर्व मुले राहुरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे म्हंटले असून
या निवेदनावर योगेश राऊत, संकेत ठुबे, सिद्धार्थ उगले, ओंकार तारडे, कृष्णा शिवले, प्रद्युम्न नालकर, प्रतिक जाधव, ओम उगले, सचिन सोनवणे, सौरभ निकम, राज ओहोळ, रोहित सोनवणे आदींच्या सह्या आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम