अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकटाच्या सामना करत पीक पिकवणारा शेतकऱ्यांवर आता आस्मानी संकट कोसळले आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळीने हजेरी लावली आहे.
यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. वादळ, अवकाळी पाऊस, गारपिटीने गहू, कांदा, डाळिंब आदी पिकांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.
खरीप हंगामातील नुकसानीनंतर पुन्हा रब्बीच्या अखेरीसही पावसाने केलेल्या नुकसानीची आमदार मोनिका राजळे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांना माहिती सांगताना शेतकरी गहिवरले.
पाथर्डी तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे वृद्धेश्वर कारखाना (ता. पाथर्डी) परिसरातील चितळी, पाडळी अशा १५ ते २० गावांतील शेकडो एकर क्षेत्रावरील कांदा, केळी, डाळिंब, गहू, हरभरा, मका, टरबूज, चिंच, आंबा, घास आदी पिकांचे नुकसान झाले.
रविवारी आमदार मोनिका राजळे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम वाडकर, तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांनी नुकसानग्रस्त चितळी, पाडळी, साकेगाव, काळेगाव,
सुसरे, पागोरी पिंपळगाव, सोमठाणे, सांगवी, प्रभुपिंपरी, माळेगाव, निपाणी जळगाव, कोरडगाव, कळसपिंप्री, आखेगाव, ढवळेवाडी या गावात पाहणी केली.
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गारपिटीमुळे हिरावला गेला. लाखोंचा खर्च वाया गेला. नुकसानीबाबत माहिती सांगता शेतकऱ्यांना गहिवरून आले. प्रशासनाने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|